Tuesday, June 19, 2012

थरारक जंगल भ्रमंती (भैरवगड)-२

रात्री मोठ्या तोंडाने लवकर उठून जायचय असं म्हणत होतो पण जेव्हा डोळे उघडले तेव्हा सूर्यनारायण आमची वाट पाहून कंटाळून पुढे निघून गेले होते. डोळे चोळत तंबूबाहेर आलो तेव्हा एकदम दचकलोच..आख्खी शाळा आणि मास्तर आमच्याकडे टकाटका पहात होते. एकतर आम्ही त्यांच्या जागेवर आक्रमण केले होते आणि शाळा भरायची वेळ झाली तरी निवांत झोपून होतो.
पहिल्या प्रथम त्यांच्या गुरुजींजवळ जाऊन विनापरवानगी शाळेत राहिल्याबद्दल माफी मागितीली. त्यांनी खुल्या दिलाने माफ केले आणि तंबु आणि आमचे इतर साहित्य याबद्दल आपले शंकानिरसन करून घेतले. (शिक्षकाच्या पेशात असल्याने सतत प्रश्न विचारायची सवय दुसरे काय.. नशिब एक निबंध लिहून आणा नाय म्हणले स्मित)
शक्य तितक्या भराभर आवरले आणि नाष्टा स्कीप करून रामघळीच्या दिशेने चालू पडलो.
वाटेत धनगरवाड्यातून वाटाड्या घ्यायचा होता पण आमच्या निवांत कार्यक्रमामुळे कुणी आता तिथे असतील का याबाबत शंकाच होती. एकतर उशीर झालेला आणि आता अवजड सॅक पाठीला (जंगली जयगडला ते सुख होते) त्यामुळे चाल अगदीच मंदावली होती. अजुन बराच पल्ला गाठायचा होता आणि सुरूवातीलाच असे होतयं म्हणल्यावर जरा काळजी वाटायला लागली. पण सुदैवाने तिथे रस्ता बांधायचे काम सुरू होते आणि त्याच्या साहित्याची वाहतूक करणारा ट्रक आम्हाला मिळाला.
त्या भगभगीत वातावरणात असली ओझी घेऊन आम्ही भैरवगडवर निघालोय म्हणल्यावर गावकर्यांनी मनातल्या मनात आमच्या बिनडोकपणाची तारीफच केली असेल पण वरवर मात्र त्यांनी फारसे नाऊमेद केले नाही. या उलट कुठल्या वाटेला गवे आढळतात आणि एक एकांडा आणि शिंगमोडका गवा कसा दिसतो आणि कुठे त्याचा वावर असतो याचे रसभरीत वर्णन आम्हाला ऐकवले. बास अजून काय हवे, मला तर कधी एकदा तो गवा दिसतोय आणि त्याचे मनसोक्त फोटो काढतोय असे झाले होते. कमालीचा चढ चढून त्या ट्रकने आम्हाला धनगरवाड्यापाशी टाकले आणि पुढे रवाना झाला.
अपेक्षेप्रमाणेच धनगरवाड्यातली सगळी पुरुष मंडळी कामावर निघून गेली होती आणि काही पोरे-टोरे खेळत होती. तिथल्याच एका अंगणात बसून वाटाड्याची चौकशी केली..भैरवगडची वाट दाखवायला माणूस पाहिजे ऐवढे त्या पोरांना कळलं आणि एकजण उद्गारला...
"मंग आज्जी येईल की वाट दावाया..."
आयला, आज्जी...नक्की आज्जीच म्हणाला ना तो...अ ओ, आता काय करायचं
खात्री करून घेण्यासाठी त्याला विचारले "आज्जी???? काय वय आहे आज्जीचं?"
"१६" एकदम ठाम उत्तर
शप्पथ, हे काय लचांड, आपल्याकडे तायांना कसं आक्का वगैरे म्हणतात तसे काहीतरी वाटले..पण १६ वर्षाची मुलगी अशा अनोळखी मुलांबरोबर (मी त्यात असलो तरी मुलेच स्मित) पाठवणे अशक्य होते...
माझी एकदम ट्युब पेटली..
त्याला म्हणले "तुझे नाय, आज्जीचे वय काय आहे?"
"तिचं व्हय, कुनास ठावकस आसंल ६०-६५..."
आयला अ ओ, आता काय करायचं काय धक्क्यावर धक्के...
भैरवगडसारख्या जंगली किल्ल्यावर वाट दाखवायला म्हणून ६०-६५ वर्षांची आज्जी येणार ही कल्पनाच काहीतरी अजब होती. कारण तिथून किमान अंतर ७-८ किमी तरी नक्कीच होते. तेवढ्यात त्या पोराने म्हातारीला आणले तिथे...
अज्जीबाई चांगल्याच टुणटुणीत होत्या आणि काठी-बीठी घेऊन निघायच्या तयारीत...
जरा बिचकतच विचारले, या आम्हाला वाट दाखवायला येणार..पण आम्ही परत नाही येणार. आम्ही तिथून पुढे प्रचितगडला जाणार आहोत. त्यामुळे त्यांना एकट्याने परत यावे लागेल.
तरीपण त्यांना काय नाय..फक्त प्लॅनमध्ये बदल ऐवढाच केला ही
"मगं, शंकर्‍या बी येईल माझ्या संगट. रानात म्होप आसवली हायती, एकटया बाईस्नी नाय व्हायाच."
आमची काहीच हरकत नव्हती..पण जंगली जयगडच्या अनुभवावरून खिसा मोकळा करावा लागणार हे निश्चित होते. भित भित रकमेबाबत विचारले...
"द्या की समजून"
(या वाक्याचा मला अतिव संताप आहे...समजून म्हणजे काय..तिथे काय रोज जाणे येणे असते का समजायला..कमी दिले तर अपमान, जास्त दिले तर फसवणूक..डोक्याला शॉट राग)
"तरी पण सांगा तुम्हीच..."
"आता बगा, मी आणि माझा नातू येणार..आता निगायला उशीर झाला म्हंजी आमी रात्रीचं काय परत नाय येनार..उद्याच्याला निगणार..."
(आज्जी पाल्हाळ आवरा आणि आकडा बोला पटदिशी)
"तवा द्या आठशे रुपाय..."
(धडाम- बॉम्बगोळा स्मित)
आज्जीनी बोल बोल म्हणता बरेच मागितले होते की. एवढे रक्कम मोजणे अवघड होते. त्यामुळे तिथेच अंगणात आमची गोलमेज परिषद भरली...
तसे आम्ही चौघेही नियमित ट्रेकिंग करणारे आणि स्वप्नील तर पट्टीचा ट्रेकर. त्यामुळे तो प्रश्न नव्हता. बरोबर तंबू आणि स्वयंपाकाचे सगळे सामान असल्यामुळे मुक्कामाला मंदिर जरी गाठू शकलो नाही तरी अडचण नव्हती. मुद्दा होता पाण्याचा...
उन्हाळा अतिशय कडक होता आणि वाट चुकली तर (तोही अनुभव ताजा ताजा होता) पाण्याशिवाय मरणाचे हाल झाले असते. याच मुद्द्यावर निर्णय होत नव्हता...मला वाटाड्या हवा असे वाटत होते पण एवढे देणे खरेच अशक्य होते. घासाघिस करून पाहीली, एवढेच पैसे आहेत असे म्हणून झाले पण म्हातारी काय बधेना.
शेवटी मनाची तयारी केली आणि काय होईल ते होवो म्हणून निघालो. अर्थात निघण्यापूर्वी पोटभर पाणी प्यालो आणि पाण्याच्या बाटल्याही गच्च भरून घेतल्या.

याच त्या आज्जीबाई
तिथून थोड्याच अंतरावर रामघळ आहे. रामदासस्वामींच्या वास्तव्यामुळे पुनीत झालेले स्थळ...



पावसाळ्यात याची शोभा अवर्णनीय असते.(फोटो पाहिले होते) पण आत्ता उन्हाळ्यात अगदीच रखरखाट. गुहा चांगली लांबरुंद असली तरी वरच्या प्रचंड दगडामुळे ती अगदीच लहान वाटते.


थो़डा वेळ विश्रांती घेतली...बिस्कीटे खाल्ली. (सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते आणि आता बरीच मोठी वाटचाल होती).

प्रणव, अस्मादिक, अमेय आणि स्वप्नील
गुहेच्या डाव्या बाजूने एक पाईपलाईन जाते आणि तिथूनच गुहेच्या डोक्यावर जाण्यासाठी वाट आहे. आणि इथुन पुढे मानवी वस्तीशी जो संपर्क तुटतो तो थेट पाथरपुंजपर्यंत...विस्तिर्ण घनदाट जंगल, मुबलक प्राणी पक्षी आणि गवेसुद्धा...


मस्तच अनुभव होता तो...अर्थात जंगल असले तरी वाटचाल फारशी सुखद नव्हती. एकतर पाण्यामुळे पाठीवरचे वजन खूपच वाढले होते. आणि उन्हामुळे अंग घामाने नुसते पाझरत होते. कपड्यांनी किती चिंब व्हावे याची कमाल मर्यादा गाठली होती आणि पार अगदी मोजेपण किच्च झाले होते.

असेच वैतागून चालत चालत मोकळ्या भागात आलो.

तिथून या जंगलाचा आवाका लक्षात आला. जिथे नजर फिरवावी तिथे हिरवेगार साम्राज्य पसरले होते. या निबीड अरण्यात आपण वाटचाल करत असताना वन्यश्वापदांच्या नजरा आपल्यावर रोखलेल्या असणार याची जाणीव होत होती.




आणि त्याची प्रचिती लगेचच आली. अरुंद रस्त्यावरून एका रांगेने चालत जात असताना पुन्हा एकदा भॉँक आवाज आला आणि पाचोळ्यातून धावत गेल्याचे आवाज. भेकराला आम्ही पाहण्यापूर्वी त्याने आम्हाला पाहिले होते आणि तीनचार ठिकाणहून धावण्याचे आवाज म्हणजे जास्त संख्या होती. सगळेच पसार...श्या..अरेरे


पुढे कमालीचा उतार पार करून आणि तितकाच चढ चढून अत्यंत गलितात्र अवस्थेत चालत राहिलो. काहीझाले तरी अंधार पडायच्या आत मंदिराशी पोचायचे याच निर्धाराने पावले उचलत राहीलो आणि चक्क पोचलोही.
त्या मंदिराच्या दर्शनाने काय बरे वाटले सांगू...एकतर त्या अनभिज्ञ जंगलात कसलीही माहिती नसताना, वाटाड्या न घेण्याची रिस्क घेत भर उन्हाळ्याचे आम्ही गेले पाच-सहा तास चालत आलो होतो. जर चुकलो असतो तर काय झाले असते याची कल्पनाही करवत नव्हती. पण कसलेही संकट न येता सुखरूप आम्ही इत्सित स्थली पोहोचलो होतो.

गेल्या गेल्या अमेयने छानपैकी कोकम सरबत बनवले आणि ते पिऊन एकदमच रिफ्रेश झालो.
असेच निवांत पडून राहिलो तोच माणसांचा बोलण्याचा आवाज येऊ लागला. थोड्या वेळातच काहीजण येऊन मंदिरात दाखल झाली. अधिक चौकशी केली तेव्हा कळले की ती कोकणातली मंडळी होती. खालच्या एका गावातले सगळे शिक्षक लोक्स आणि ट्रीप म्हणून ते किल्ल्यावर आले होते.
जात्याच शिक्षक असल्याने त्यांच्या तोंडाचा पट्टा चालूच होता आणि आता हे लोक रात्रीच्या झोपेचे खोबरे करणार हा विचार मनाला चाटून गेला.
दरम्यान, रात्र होतच आली होती आणि काही जण आल्या आल्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली. एकंदरीत बडबडीवरून सामिष बेत होता हे कळून चुकले आणि इथे आमच्या तोंडाला पाणी सुटायला सुरूवात झाली.
मग अत्यंत धूर्तपणे आम्ही आमचा डाव टाकला. आमच्याबरोबर नॉर सूप्सची पाकीटे होती. त्यातली दोन सूप बनवायला घेतली. एक आमच्यासाठी पुरेसे झाले आणि उरलेल्यामध्ये थोडे पाणी घालून त्या मंडळींना प्यायला दिले. मंचुरियन सुप ही त्यांच्यासाठी मोठीच गोष्ट होती. त्यामुळे आमचे मोठेच स्वागत झाले त्या ग्रुपमध्ये. आणि त्यांची तयारी होईपर्यंत आम्ही निवांत ताणून दिली.
आणि अपेक्षेप्रमाणे त्यांचे जेवणासाठी आमंत्रण आलेच. आम्ही ताट घेऊन तयारच होतो पण उगाचच आढेवेढे घेतले.
"नाही आम्ही आणलेय जेवणाचे, आता बनवणार.."
"अहो कशाला, या की, चारजण काय जड नाय आम्हाला..बसा जरा आमच्या पंगतीला..."
आधीच दिवसभराची वाटचाल, सकाळपासून बिस्कीटाव्यतिरिक्त काहीही खाल्लेले नव्हते आणि अर्ध्या तासापूर्वी घेतलेले सूप याचा त्रिवेणीसंगम होऊन अभूतपूर्व अशी भूक लागली होती. आणि त्या बिचार्‍यांना काय ओढवून घेतलेय याची कल्पना नव्हती. सगळा संकोच बाजूला ठेऊन त्या कोंबडी आणि भाकरीच्या जेवणावर तुटून पडलो. अपवाद फक्त प्रणवचा..तो पक्का म्हणजे पक्का शाकाहारी..अरेरे
त्याच्या एकट्यासाठी काय बनवणार...त्यामुळे बिचार्‍याने भातात कोकम सरबत घालून खाल्ले...त्याला कोंबडीचा आग्रह केला पण ऐकले नाही त्यामुळे मग त्याच्याबद्दलचे वाईट वाटून घेणे थांबवले आणि मनसोक्त आडवा हात मारला.इतका की उठून चालायला होईना..तिथेच लोळत राहीलो बराच वेळ.
रात्र वाढली तशी मंडळी पांगली..सगळ्यांनी मंदिराची जमिन साफ करून डेरा टाकायची तयारी केली. आमच्यासाठी पण त्यांनी जमिन झाडून दिली पण आम्ही बाहेरच तंबू टाकून मुक्काम करण्याचा बेत जाहीर केला तेव्हा ते धसकलेच..
"अहो, जंगल लय बेकार आहे..कशाला उगाच धाडस करता राव तुमीपण..आमच्यात झोपा."
पण आम्हाला बाहेरच झोपायचे होते त्यामुळे त्यांचे न ऐकता तंबू उभारायला घेतले. त्या शिक्षकांनी पदोपदी समजावून सांगितले आणि शेवटी नाद सोडून आत गेले. दाराला आतून कडी लावल्याचा आवाज आला आणि आता एकदम एकटे असल्याची जाणीव झाली.
पण एकाला चौघे आहोत म्हणत धीर दिला आणि जडावलेल्या अंगाने पडी टाकली.
किती वेळ गेला ते कळले नाही पण एकदम जाग आली. झोपण्यापूर्वी पाणी भरून ते वार्‍यावर गार रहावे म्हणून तंबूबाहेरच ठेवले होते. ती बाटली एकदम धप्पकन पडल्याचा आवाज आला आणि पोटात खड्डा पडला.
शप्पथ..वार्‍यामुळे पडावी एवढी हलकी बाटली नव्हती..मग बाहेर कुणी आले की काय..शिक्षकांपैकी म्हणावे तर टॉर्च लावल्याशिवाय कुणी अंधारात कडमडत आले नसते. मग प्राण्यांपैकी कुणी...
मी अक्षरश सगळे प्राण कानात आणून काही आवाज येतोय का बघत होतो...पण काहीसुद्धा नाही...भितीने अगदी माझा पुतळा झाला होता..पडल्याजागीच अंग एकदम स्थिर करून काहीतरी होण्याची वाट पाहत होतो..(आत्ताही लिहीताना मला ते आठवून अंगावर काटा येतोय)..काय करायचे..टॉर्च लावून बाहेर पाहण्याची हिंमत होईना...अमेयला अलगद हलवून उठवायचा प्रयत्न केलेला पण तो गाढ म्हणजे गाढ झोपला होता...बाहेरच्याने तंबुत शिरायचा प्रयत्न केला किंवा हल्ला झालाच तर काय करता येईल या विचाराने भंजाळून गेल्यासारखे झाले..पण बाहेर काहीच हालचाल होईना...च्यायला काय वैताग..असाच पडून राहिलेलो असताना झोप कधी लागून गेली ते कळलेच नाही.

No comments:

Post a Comment