Thursday, June 28, 2012

दुर्गभ्रमंती करवीरनगरीची भाग-१

याआधी कोयनानगर भटकंती वाचून आलेल्या माबोकरांना मात्र हे लिखाण काहीसे कंटाळवाणे वाटण्याची शक्यता आहे कारण तसे रोमांचक प्रसंग काही घडले नाहीत.हा ट्रेक तसा सुखासीनच झाला. कमालीच्या अवघड रस्त्यांवरून, जंगलातून, कच्च्या मातीच्या रस्त्यावरून बाईक्स नेण्याचा थरार आणि जानेवारीची सुखद थंडी अनुभवत हमरस्त्यावरून सुसाट गाडी मारण्यातली गंमत अर्थातच अवर्णनीय. काळानंदी किल्ल्याभोवतालच्या गर्द जंगलात हरवण्याचा प्रसंग असो वा नेसरी येथे प्रतापराव गुजरांच्या स्मारकापुढे नतमस्तक होण्याचा..सर्वच फारच विलक्षण...
या भटकंतीत आम्ही कोल्हापूर विभागातले पन्हाळा आणि विशाळगड सोडून बाकी सर्व किल्ले पालथे घातले.
त्यात गगनगड, शिवगड, भूदरगड, रांगणा, गंधर्वगड, सामानगड, पारगड, काळानंदीगड आणि महिपालगड असे नऊ किल्ले समाविष्ट होते. यातल्या काळानंदी सोडला तर बाकी सर्व गडांच्या मध्यापर्यंत किंवा अगदी वरपर्यंत गाडीरस्ता झालेला आहे. त्यामुळे कुटुंबासहीतही हे ट्रेक करणे सहजशक्य आहे.
माझ्यापरीने मी आमचा प्रवास तुमच्यासमोर उभा करण्याचा प्रयत्न करत आहे. कृपया गोड मानून घ्यावेत ही विनंती...

नोव्हेंबरमध्ये झालेल्या बाईकवरून कोकण भटकंतीमुळे बाईक ट्रेक्सची क्रेझ निर्माण झाली होती. त्यामुळे कोल्हापूर रेंजचा प्रस्ताव येताच मी त्याला बाईकवरून जाण्याची उपसूचना मांडली आणि ती सर्वानुमते संमतही झाली.
यावेळचा प्लॅन जंगी होता. कोल्हापूर विभागातले सगळेच किल्ले पार पाडायचे होते आणि बहुतेक सगळ्याच गडांवर गाडी जात असल्यामुळे ट्रेक कमी आणि बाईकींगच जास्त होणार होते. त्यातही पुणे ते कोल्हापूर आणि परत हाच ५०० किमी पल्ला होता.
पण जास्त विचार न करता बाईकला किक मारून निघालो. वाटेत कराडला माझ्या मावसभावाचे लग्न अटेंड करूनच पुढे जायचे होते. अमेय आधीच पोहोचला होता तर स्वप्नील आणि रोहन डायरेक्ट मुंबईवरून कोल्हापूरात भेटणार होते. त्यामुळे भल्या पहाटे मस्त गारठा अनुभवत सुसाट गाडी मारली आणि अगदी मुहुर्ताला कार्यालयात जाऊन ठेपलो.
दुसरे दिवशीपासूनच अडचणींना सुरूवात झाली. आमच्या दोघांच्या दोन सॅक घेऊन एकाच गाडीवर बसणे शक्यच नव्हते. त्यावेळी वर्‍हाडी मंडळींच्या गाडीतून कोल्हापूरला एक सॅक पाठवून तात्पुरते काम भागवले पण आता पुढे काय करायचा हा मोठाच प्रश्न होता. दोन सॅक घेऊन आपल्याला जाता येणार नाही हे आधीच लक्षात कसे आले नाही याचे नवल करत कोल्हापूरला पोचलो.
तिकडे स्वप्नील आणि रोहनचे वेगळेच नाटक झाले होते. त्यांनी मुंबई-कोल्हापूर बायकिंग वाचवण्यासाठी मालगाडीतून बाईक्स पुढे पाठवल्या होत्या. त्यांना वाटले होते थोडक्यात होईल पण काहीतरी लोचा झाला आणि दोन बाईक्सचे मिळून तब्बल १८०० रुपये भरावे लागले. त्यात पेट्रोलच्या टाक्या संपूर्ण रिकाम्या केल्यामुळे रखडत पेट्रोलपंपापर्यंत ढकलत न्याव्या लागल्या त्या वेगळ्याच. डोकी शांत करण्यासाठी आधी पोटात इंधन भरून घेतले (गाड्यांच्या आणि आमच्याही) आणि मग गहन चर्चा सुरू झाली की करायचे काय..
चौघात मिळून तीन बाईक्स होत्या आणि चार भल्या मोठ्या सॅक्स...
एक तोडगा असा निघाला की माझ्या बाईकवर एक सॅक आडवी बांधायची आणि एक माझ्या खांद्याला, रोहनच्या पल्सरवर अमेय आणि स्वप्नील त्याच्या पॅशनवर...
किती पटकन तोडगा काढला आपण हा आनंद काही काळच टिकला..कारण सॅक बांधावी लागेल याचा अंदाज नसल्याने बाजूच्या दुकानातून सुतळी घेऊन ती कशीबशी बांधली होती आणि ती छानपैकी कलत होती. हायवेवर अशा पद्धतीची कसरत म्हणजे प्राणाशी गाठ. त्यामुळे तातडीने दुकान शोधून ऑक्टोपस मिळवणे भाग होते.
नशिबाने एका दुकानात मिळाला पण तो लहानसा असल्याने पुरेसा नव्हता, मग चक्क एक रस्सी घेऊन बांधली. दरम्यान, मी बुटांची लेस, स्वप्नीलने स्टोव्हची पीन अशा किरकोळ खरेद्या उरकून घेतल्या.
अर्थात, ऑक्टोपसमुळेही सर्व प्रश्न सुटले नव्हतेच. पाठी बांधलेल्या सॅकच्यावर माझी सॅक टेकवून ठेवावी लागत असल्याने माझ्या खांद्यावर सगळा लोड येत होता. आणि जास्त काळ अशा पद्धतीने चालवणे मला शक्य नव्हते. त्यामुळे अमेयने घरी जाण्याचे जाहीर केले. तो कोल्हापूरातून एका मित्राची गाडी घेणार होता पण बिचार्याला नाही मिळाली त्यामुळे आमच्यावर हा प्रसंग ओढवला होता. त्यामुळे तुम्ही ट्रेक करा मी घरी जातो असे त्याने सुरू केले. बघु पुढे काहीतरी सोय करू असे सांगत त्याला कसाबसा थोपवून धरला.
अशा वैतागलेल्या परिस्थितीतच आम्ही रामलिंग आश्रमाकडे. गगनगिरी महारांजांनी इथल्या गुहेत तपस्या केली होती. हे स्थान अतिशय रमणीय आणि प्रसन्न आहे. गुहेच्या बाहेरी पांडवकालीन मंदिराचे अवशेष आढळतात. पावसाळ्यात तर इथले दृश्य अवर्णनीय असणार हे बघुनच जाणवत होते.


पावसाळ्यात याच्यावरून धबधबा कोसळत असतो




तिथे सेवेसाठी म्हणून राहीलेल्या एकांशी गप्पा झाल्या आणि त्यांनी अगदी प्रेमाने चहा पाजला. त्यांना नमस्कार करून ठेपलो ते गगनगडावर.
गगनगड दुर्दैवाने किंवा सुदैवाने आता जवळपास गगनगिरी महाराजांच्या आश्रमाने व्यापला आहे. दुर्दैवाने अशासाठी की जवळपास सगळाच किल्ला त्यांनी आपल्या ताब्यात घेऊन तिथे भक्त निवास आणि अन्य बांधकामे करून किल्ला पार गायबच करून टाकला आहे. आणि सुदैव असे की पर्यटनस्थळाचा दर्जा मिळण्यापेक्षा हा आश्रम कधीपण परवडला. किमान इथे अतिशय स्वच्छता राखली जाते त्यामुळे अनेक गडांवर आजकाल दिसणारी सिगारेटची पाकिटे, दारूच्या बाटल्या आदी कचरा दिसत नाही आणि गडाची निगाही चांगल्या प्रकारे राखली जाते.
गेल्या गेल्याच मुक्कामाची चौकशी केली तेव्हा कळले की रितसर परवानगी घेतल्याशिवाय किल्ल्यावर मुक्काम करता येणार नाही. आणि भाविकांव्यतिरिक्त अन्य लोकांना भक्त-निवासात राहू दिले जात नाही. आता रहायचे कुठे हा मोठाच प्रश्न उद्भभवला. मग मी तिथल्या व्यवस्थापकला टार्गेट केले. अखंड बकबक करून त्याला सगळी माहीती विचारून घेतली. मग आम्ही कसे पत्रकार आहोत आणि भाविकांची श्रद्धास्थाने पहात फिरत आहोत, रामलिंगला गेलो होतो तेव्हा तिथल्या व्यवस्थापकांशी कसे बोलणे झाले आदी आदी टकळी चालवली. तरीपण त्याच्या चेहर्यावरचा स्नायू हलेना तेव्हा अगदी मानभावीपणे बरं आम्ही किल्ला पाहून येतो तोपर्यंत आमच्या सॅकतरी ऑफीसात ठेऊन घेता का असे विचारले.
तेव्हा मग प्रभुकृपा जाहली.
"थोडा वेळ थांबा आणि भक्तनिवासाची चावी घेऊन जा"
अरे वाहवा, हे तर बेस्ट झाले. मग त्या खोलीत सॅका टाकल्या आणि किल्ला पहायला सुटलो.
गगनबावडा हा भाग महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखला जातो अशी माहीती इथे मिळाली. दक्षिण कोकणातील बंदरावर उतरलेला माल घाटावर आणणऱ्या वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती झाली.
पन्हाळ्यावर राजधानी असलेल्या शिलाहारवंशीय राजा भोज याने या गडाची बांधणी केली. आज गडावर सगळे आधुनिक बांधकामच उरले आहे.
गडावर शंकर, मारूती, राम आदी मंदिरे आहेतच शिवाय एक संगमरवरी ध्यानमंदिरदेखील आहे. त्या मंदिराच्या आवारात गगनगिरी महाराजांचा अश्वारूढ पुतळाही आहे.




मी वाचलेल्या माहीतीनुसार अश्वारूढ व्यक्तीच्या पुतळ्यात जर घोड्याचे दोन्ही पाय उंचावले असतील तर ती व्यक्ती रणांगणात वीरगती प्राप्त झालेली असते. एकच पाय उंचावलेला तर रणांगणात जखमी आणि नंतर कालांतराने मृत्यू आणि चारही पाय टेकवलेले असतील तर नैसर्गिक मृत्यू. पण इथे गगनगिरी महारांजाच्या पुतळ्यात घोड्याचे दोन्ही पाय उंचावलेले आहेत. हे असे का कोणी जाणकार माहीती देऊ शकतील काय.

गडाच्या बुरुजावरून दिसणारा किल्ल्याचा संपूर्ण आकार

विशेष म्हणजे पिराची कबर म्हणून एक मशिदही उभी आहे.

मग मस्तपैकी कड्यावर बसून सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य डोळ्यात भरून घेतले. रात्री मठात महाप्रसादाची व्यवस्था होतीच त्यामुळे आज चूल पेटवण्याचे कष्ट टळले होते.
मग खाली उतरलो तेव्हा आरतीची तयारी सुरू होती. एक-दोन परदेशी पाहुणेही आरतीसाठी आलेले होते.
प्रसादाला गरमागरम भात आणि तिखटजाळ रस्सा होता. त्या खमंग वासानेच आग पेटली पोटात पण जेवणापूर्वीचे श्लोक संपायचे काय नावच घेईना. एकाचे संपले की दुसरा सुरू करे, मध्येच महारांजाचा जयजयकार...की परत दुसरा श्लोक...डोळ्यासमोर त्या भातातून निघणार्या वाफा निवत चालल्या होत्या. शेवटी एकदाचे कधीतरी महारांजाचा जयजयकार करून सगळे प्रसादावर तुटून पडले.
:ज्या माबोकरांनी माझे आधीचे लिखाण वाचले आहे त्यांना आमच्या भस्म्या मोडबद्दल सांगायची काही गरज नाही. स्मित )
आकंठ जेवण करून जर विसावतोच तोवर एकाने तिथून हाकलले."हा मठ आहे, गप्पा मारायची जागा नाही. तुमच्या खोल्यांमध्ये जावा. "
अरेच्चा मला तर एकदम पुण्यात आल्याचा भास झाला. पण त्यांचा आदर राखून गडावर जाण्याचा बेत आखला. त्या अंधारात गडाच्या माचीवर पोहचतो तोच तिथूनही कोणीतरी खेकसले.
"कौन है वहां पे, चले जाव, इधर मत आव..."
वैतागून तिथेच थोडे खाली येऊन पायर्र्यांवर पहुडलो. एकेका पायरीवर एक..तेवढ्यात अमेयच्या डोक्यात एक वात्रट कल्पना आली. म्हणे आपण असेच पडून राहू गुपचूप अंधारात आणि कुणी आले की चौघांनी एकदम उठून भॉँक करायचे....
तो प्रसंग डोळ्यासमोर आणून भरपूर हसून घेतले...तो दिवस होता २५ जानेवारी. त्यामुळे उद्या लवकर उठून गडावर ध्वजवंदनासाठी जायचा बेत आखत रात्री कधीतरी खोल्यांमध्ये येऊन निद्राधीन झालो.
क्रमश

No comments:

Post a Comment