Monday, December 7, 2009

लखलख चंदेरी



आणि राजा विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही.... या गोष्टीप्रमाणे आम्ही पुन्हा एकदा उमेशच्या मागे लागून नविन ट्रेकचा हट्ट धरला, तोही आमच्याच जातीचा त्यामुळे एक सोयीचा दिवस पाहून आम्हा घुमक्कडांची चौकडी नव्या भटकंतीला किल्ला ठरविला होता शिवप्रभूंची राजधानी रायगड. त्यावेळी ताम्हीणी-डोगंरवाडीचा रस्ता बाईकने जाण्यायोग्य नव्हता. त्यामुळे आम्ही वरंधा घाटाने जायचे ठरविले. नेहमीप्रमाणेच लवकर निघू असा धोशा लावत दुपारी उशीराच निघालो. वरंधा घाटापाशी पोचलो तेव्हा सुवार्ता कळली की काही दुरूस्तीच्या कामांमुळे घाट काही तास बंद राहणार आहे।
उमेशने तातडीने पर्याय काढला. त्याच्या म्हणण्यानुसार, आत्ता घाट सुरु होईपर्यंत वेळ काढण्याएवजी मांढरदेव घाटाने पुढे जावे आणि नंतर पुढे महाबळेश्वरला जाऊन आंबेनळी घाटाने कोकणात उतरून पुढे जावे.आम्हाला काय काहीही चालणार होते, तेव्हा मम॥ म्हणून गाड्यांवर बसलो आणि निघालो.घाटापाशी आलो तेव्हा छानपैकी अंधारून आले होते. एका छोटेखानी हाटेलात थोडेसे खाऊन पुन्हा गाड्यांवर स्वार झालो आणि घाटाच्या दिशेने सुटलो. घाटाच्या सुरूवातीला थोडीशी वर्दळ होती, पण नंतर मात्र आख्या घाटात आम्हाला एकही गाडी पास झाली नाही. संपुर्ण घाटात फक्त आमच्याच दोन गाड्या. आजबाजूला मिट्ट काळोख॥ फक्त हेडलाईटच्या उजेडात दिसेल एवढाच रस्ता दिसत होता. उमेशची गाडी आमच्या पुढे होती. एका वळणावर त्याला काही दिसले आणि त्याने आम्हाला थांबा.. थांबा अशी खूण केली. आम्हीही उत्सुकतेनी काय आहे ते पहायला गाडी पुढे घेतली. तोपर्यंत ते दोघे गाडीवरून ऊतरले होते. उमेशने माझ्या मित्राला हेडलाईट बंद करायला सांगितले. लाईट बंद झाला आणि अचानक ते दिसले
रस्त्याच्या बाजूला एक झाड होते त्यावर मोठ्या संख्येने काजवे बसले होते. आणि त्या निरव काळोखात ते झाड अक्षरशः लखलखत होते. आम्ही डोळे विस्फारून ते विलक्षण दृश्य पहात होतो. मी आत्तापर्यत असा देखावा कधीच पाहिला नव्हता. आजबाजूचा अंधार, बोचरी थंडी, संपुर्ण घाटात आम्हीच एकटे असल्याची जाणीव सगळं काही विसरायला झालं आणि त्या लखलखत्या प्रकाशाने सारे आसमंत वेढून टाकले.निसर्गाच्या या अनोख्या किमयेला दाद देत पुढे निघालो पण मन मात्र त्या झाडाभोवतीच रेंगाळत होतं. थोडे पुढे जाताच तर अजूनच धमाल आली.रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांच्या फांद्या एकमेकांमध्ये मिसळल्या होत्या आणि त्या जंक्शनवरही काजवे मंडळींची शाळा भरली होती. त्यामुळे त्याखालून जाताना मला तर लग्नाच्या मांडवाखालून जात असल्याचा फील आला. (त्यावेळी माझे लग्न व्हायचे होते तरीही..) मला आत्ता खरेच दु:ख होतेय की मी ते दृश्य शब्दांमध्ये वर्णन करू शकत नाही
तिथून पुढे जाताना आलेला अनुभवही तितकाच विलक्षण. मी आधी सांगितल्याप्रमाणे आख्या घाटात आमच्याशिवाय एकही गाडी नव्हती. पण जेव्हा आम्ही घाट उतरायला सुरूवात केली तेव्हा मला असे जाणवले की मागून एक गाडी येत आहे.मी एकदम मागे वळून पाहीले तेव्हा काळोख्या अंधाराशिवाय काहीच दिसले नाही. पुढच्या वळणावर पुन्हा एकदा भास झाला. आणि यावेळी इतका स्पष्ट की मला खरोखर वाटले की आमच्या मागून एक कार येत आहे
आता मला हे सांगता येणार नाही की यामागचे स्पष्टीकरण काय आहे ते पण मला आजही तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो. नुसताच भास म्हणावा तर मला प्रत्यक्षात दिसल्यासारखे जाणवत होते.मला जाणवत होते की आमच्या मागे एक पांढर्‍या रंगाची मारूती कार येत आहे. त्यात एक मध्यवयीन जोडपे आहे. आणि सावकाशपणे ती गाडी घाट उतरत आहे.मला शेवटी हा प्रकार इतका असह्य झाला की मी सगळ्यांना थांबायला लावले. मी काही पावले मागे जाऊन पाहीले की कोणच्या गाडीचा मागमूस लागतोय का. मला अपेक्षा होती की एखाद्या तरी गाडीचा लाईट दिसेल, पण त्या दाट मिट्ट काळोखाखेरीज मला काहीही दिसले नाही आणि जाणवलेही नाही
मी सगळ्यांना हा भास सांगितला. हरिश्चंद्रगडाचा अनुभव ताजा असल्यामुळे कोणी टिंगल-टवाळी केली नाही, पण फार गांर्भियानेही घेतले नाही."तुझ्यावर बहुदा त्या घटनेचा जरा जास्तच पगडा बसला आहे", असा निष्कर्ष काढून सगळे रिकामे झाले.परत गाड्या सुरू करून जाऊ लागतो तो परत हा भास व्हायला सुरूवात झाली. मला वाटले खरेच माझ्या मनाचे हे खेळ आहेत. नाहीतर बाकीच्या तिघांनाही काहीतरी जाणवायला पाहीजे होते.पण मला वरचेवर मागे वळून पहायची इच्छा होत होती, पण हेही कळत होते की मागे अंधाराशिवाय काहीच दिसणार नाही. तरीपण मागच्या गाडीतून येणारे जोडपे माझा पिच्छा सोडायला तयार नव्हते.मी निखिलशी गप्पा मारायला सुरूवात केली, म्हणलो किमान त्या निमित्ताने माझे मन दुसरीकडे वेधले जाईल.अर्थात हा प्रयत्नही असफल ठरला कारण बोलतानाही माझ्या मनातून ती गाडी आणि ते जोडपे जात नव्हते.जागेपणी स्वप्न पडल्याचा अनुभव का खरोखरच कोणती अदृश्य गाडी आमच्या मागे आहे यात मला फरक करता येईना. पुर्णपणे भंजाळलो होतो आणि अचानक शेवटच्या वळणावर मागचा आवाज थांबला.पहिले काही सेकंद मला जाणवले नाही पण लक्षात आले की आता आपल्या मागून कोणचीही गाडी येत नाहीये. आता फक्त आमच्या दोन गाड्यांचेच आवाज येत आहेत.एकदम हायसे वाटल्यासारखे झाले. मनावरचे ते अदृश्य दडपण जणू अल्लाद कोणीतरी काढून घेतले होते. तरीपण मला ही भावना त्रस्त करत होती की असे का व्हावे.नुसतेच मनाचे खेळ म्हणावेत तर ते त्या थोडक्याच भागापुरते का जाणवले. बरं कशाची भिती म्हणावी तर यात मला कुठेही घाबरून गेल्याचे वाटले नाही.पण मग असे का व्हावे याचा मला उलगडा होईना
पुढे घाट संपल्यावर वस्ती सुरू झाली. एके ठिकाणी चहाची पाटी दिसली आणि मिणमिळता बल्ब.चहाची तल्लफ सगळ्यांनाच आलेली, त्यामुळे न सांगताच गाड्या त्या खोपटाकडे वळल्या. आमच्या गाड्यांचे आवाज ऐकून खोपट्याचा मालक त्याच्या उबदार घोंगडीखालून उठला.तो चहाच्या तयारीला लागत असतानाच मी मला सतावत असलेल्या या प्रश्नाबद्दल चर्चासत्र सुरू केले.भूते-खेते, आभास असे सगळे असलेल्या या चर्चेत तो गावकरी ओढला गेला नसता तरच नवल.मग सगळी कहाणी त्याला ऐकवली
"आरं तिच्या मंग तीच ती गाड़ी असनार ,"
हे ऐकताच माझ्या मनात काय झाले असेल त्याची तुम्ही कल्पना करू शकता. मी कापर्‍या आवाजात विचारले
"कोणची गाडी?"
तो म्हणला "आवं मागल्या आठवड्यात योक गाडी खाली पल्डी व्हती. तिच असनार बगा"
"पांढऱया रंगाची होती का, तिच्यात दोघेजण होते का?" मी एकदम अधीरपणे विचारले,
"ते काय मला ठावं नाही. पण डिपारमेंटची मान्स बोलत व्हती तवा म्या ऐकलं,"
"पन तुम्हास्नी हवं असलं तर गावामंदी जावा, थकडं कललं समदं,"
बाकीच्यांच्या नजरा पाहून मी गावात जाऊया का हा प्रश्न मनातचं ठेवला.पण अजुनही मला तो प्रसंग आठवतो आणि वाटतं त्या गावात जाऊन चौकशी करावी की खरोखरच ती गाडी पांढर्‍या रंगाची मारूती होती का आणि त्यात जोडपे होते का आणि त्यांचे काय झाले?
काय म्हणताय येताय मग माझ्याबरोबर????


Friday, November 27, 2009

अमानवीय.....?


आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला। होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो। त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली। रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला। आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो। आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे। तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."मला कळेना याला आता परत काय झाले.त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

Thursday, November 26, 2009

प्रास्ताविक

नमस्कार मी आशीष फडणीस।
माझ्या ब्लॉग वर तुमचे स्वागत. मला माहिती नाही मी कीती काळ हा ब्लॉग चालवू शकेन, तरी तुमच्याशी संवाद साधण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. माझ्या लहानपणचे मला काही आठवत नाही, पण माझ्या आई वडिलांचे genes माझ्यामधे उतरले असावेत हे नक्की. त्या दोघांनाही झाडे, फुले पक्षी, निसर्ग अणि प्रवास यात विलक्षण रस. लहान असताना त्यांच्या बरोबर चिकार फिरलो होतो, पण एखाद्या गोष्टिबाबत crazy व्हावे असे त्या वयात काहीच वाटले नव्हते. मला आज कोणी विचारले की नक्को कोणत्या गोष्टीने मला प्रभावित केले, तर मला काही सांगता येणार नाही. ना मला त्या वेळचे काही आठवत ना मला एखादी घटना आठवत ज्यामुळे माझ्या आयुष्याला एक वेगळा प्रवाह फुटला.
एक शक्यता अशी आहे की आमच्या घरामागच्या तळजाई टेकडीचा त्यात मोठा वाटा असावा. एक प्रसंग मला आठवतो एकदा मी काही मिंत्रांबरोबर टेकडी उतरून येत होतो. पावसाळ्याचे दिवस होते, सगळीकडे मस्त हिरवे गार झाले होते. संध्याकाळ होती अणि अंधार पडायच्या आधी घरी पोचायची घाई करत होतो. कॅनाल ओलांडला आणि ढगांचा कडकडाट झाला. मागे वळुन पाहिले तर एक ढग तळजाई टेकडीवर कोसळत होता. फक्त तिथेच, बाकी सगळीकडे कोरडेठाक. गंम्मत वाटली आणि हसूही आले. आणि जणु मनातले कळाल्यासाऱखा तो ढ्ग आमच्याकडे आला. आमच्यावर वर्षाव करुन तो तसाच पुढे सरकत गेला. आम्हि चिंब भिजलो होतो आणि बाकी सगळीकडे पुन्हा कोरडेठाक.
बहुरुपी बहुढंगी निर्सगाची ही पहिली झलक होती. त्यानंतर जरा वेळ मिळताच तळजाई टेकडीकडे धावु लागलो. तिथल्या पायवाटा, ढोरवाटा तर ठावकी झाल्याच पण दाट झाडीमध्ये घुसुन सगळा डोंगर विंचरून काढ्ला. संध्याकाळ, रात्र, दुपार कधीही. वेळेचे बंधन नाही. दाट धुक्याची पहाट अ‍सो वा रणरणती दुपार, तळजाईला जायला कधी कंटाळा यायचा नाही. मग फिरण्याचा विस्तार वाढू लागला आणि बहकलेल्या पावलांना वाघजाई, पर्वतीपण कमी पडू लागली आणि नजर पडली सिंहगडवर.
तुफानी आणि जबरदस्त. छातीचा भाता फुलवणारी वाट. तारुण्याचे वारे कानात शिरु लागले होते आणि रगारगातून आव्हान स्विकारायला रक्त ऊसळत होतंच. इथेही वेळेचे बंधन नव्ह्तेच. एकदा आतकरवाडीपासून पुढे आलो की माणसांची संगत नको वाटते. वारा कानात शिळ घालू लागतो, पाने सळसळ करत स्वागत करतात, खोल उष्ण श्वासोच्छवास आणि पावलागणिक ठिबकणारे घामाचे थेंब चढ्णीचे आव्हान देतच राहतात. वाटेत लिंबूपाणी घेत स्टॅमिना टिकवून ठेवत वर पोहोचलो कि घामाच्या प्रत्येक थेंबाचे सार्थक होते. वारा सुसाट अंगावर येतो, सभोतालची खेडी, पुणे शहर चित्रातले वाटायला लागते. घाम सुकवून, कपडे वाळवून वारा शरीराला थंडावून टाकतो. आता गरज असते गरम वाफाळत्या चहाची. तोंड पोळून घेत खाल्लेली भजी आणि चहा हा शरीराबरोबर मनालाही टवटवी आणतो.
किती रूपे... पावसाळी धुक्यात लपेटलेला...पावसाचे तडाखे खात ऊभ्या काळाकभीन्न कड्यासारखा...हिरवीगार शाल पांघरलेला.
ईथली हिवाळातली पहाटही सुरेख. सूर्योदयापूर्वी निघावे आणि काळोख्या थंडीतच पावले टाकावीत. वर पोचेतो सूर्यमहाराज आपल्या ऊबदार सोनेरी किरणांसह दाखल होतात. ज्या प्रसन्नतेने हा तेजोमय गोल वरती येतो त्याला तोड नाही.
इथे सुरू होते माझ्या व्यसनाची कथा. डोंगर, दर्‍या, तारे, आकाश, पाणी, झाडे, फुले, प्राणी.. एक का अनेक नशेची साधने. या नशेतच अनेक ठिकाणी गेलो, पावले चालतील तेवढा चाललो, मन म्हणेल त्या दिशेला सुटलो आणि थकून घरी येईपर्यंत हिंड्लो. बरोबर कोणी असले तर असले नाहीतर एकटाच. पाठीवर सॅक टाकावी आणि तंगड्या दुखेपर्यंत भटकावे. कधी रेल्वेने तर कधी बस्-ट्रकने तर कधी जीपच्या मागे उभा राहून.
बरोबर अशीच मंड्ळी. पक्षीतज्ञ किरण पुरंदरेसह पावसाळी धुक्यात, मिट्ट काळोखात रात्रभर भिमाशंकरच्या रानात अंधारात चमकणारी दिप्तिका शोधल्याची आठवण कोण विसरणार? तशीच आठवण कात्रज-सिंहगड ट्रेकमध्ये बॅटरी संपल्यामुळे मेणबत्तीच्या मिणमिणत्या उजेडात केलेल्या वाटचालीची.
उमेश पवार... हा एक माणूस माझ्या अशा अनेक आठ्वणींचा साक्षीदार आहे. किंबहूना माझ्या या वाट्चलीचा श्रीगणेशा त्यानेच केला.
मांढरदेव घाटात रात्री काजव्यांनी लखलखणारे झाड्....कोकणकड्याची डोळे विस्फारून टाकणारी खोली...छातीएवढ्या गारठणक पाण्यातून केदारेश्वराच्या पिंडीभोवताली घातलेल्या प्रदक्षिणा...आणि लपकणार्‍या खोडाला धरत बहिरीच्या गुहेतला प्रवेश... सहज आठ्वून जातात.
अशाच काही आठवणी तुमच्याबरोबर share कराव्यात म्हणून हा लेखनप्रपंच.....