Monday, January 18, 2010

अज्ञानात सुख असते


कात्रज सिंहगड हा तसा काही अवघड ट्रेक नाही. सराईत भटक्या मंडळींसाठी तर हा अगदी बाळबोध. पण काही वेळेस असे बाळबोध ट्रेकही गंमत आणतात.
असाच एक अनुभव आहे, माझ्या ट्रेकींगच्या सुरूवातीच्या दिवसांचा. माझा एक मित्र निखिल एके दिवशी माझ्याकडे आला आणि म्हणाला की ज्यांनी अजिबात ट्रेक केलेला नाही ते कात्रज सिंहगड करू शकतील का. मी म्हणलो काहीच हरकत नाहीये. त्यावर तो म्हणाला, "माझे काही मित्र दुबईवरून आले आहेत, त्यांना एक थिलीग अनुभव हवा आहे."
"अरे मग कात्रज सिंहगड का, तो तसा कंटाळवाणा ट्रेक आहे. मला तरी त्यात काही थ्रिलींग वाटत नाही," अदी मी.
त्यानंतर आम्ही बरीच चर्चा करून ठरवले की कात्रज-सिंहगड रात्री करायचा म्हणजे त्यात थोडी गंमत येईल.
लगोलग दुसर्‍या दिवशी निघायचे ठरले. मी माझ्या द्रूष्टीने सगळी जय्यत तयारी करून निघालो. स्वारगेट बस स्टँडवर ठरल्याप्रमाणे भेट झाली. सगळा कंपू पाहिल्यावर मला जरा चिंता वाटली कारण छानपैकी सुटलेली पोटे आणि एवढे सारे वजन घेऊन हे कसा ट्रेक करणार हे मला कळेना.
असो. कात्रजला जाणारी बस सुटली आणि मी सगळ्यांच्या ओळखी झाल्यानंतर महत्वाचा प्रश्न विचारला की खाणे-पिणे भरपूर आणले आहे ना. कारण मी माझा डबा आणला होता पण यांच्या सामानाकडे पाहून त्यांनी काही फारसे आणलेले वाटत नव्हते.
त्यावर एकजण उद्गारला, "अरे वो आप चिंता मत करो, मै साथ मे ढेर सारे पैसे लाया हूं, रास्ते मे खाते खाते जायेंगे."
मला तो काय बोलतोय याची टोटलच लागेना. माझ्या चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह पाहून साहेबांनी खुलासा केला. "अरे अभी अभी हम वैष्णोदेवी करके आये है, वहा भी हम पैसे लेके गये थे, रास्ते मे काही बहोत सारी दुकाने थी वहा खाते खाते गये थे."
मी डोक्याला हात लावला. या महान लोकांनी काहीही खायला किंव प्यायला आणले नव्हते. मी निखिलला विचारले तर तो म्हणाला, "मी डाएटवर आहे, मी डिनरला फक्त उकडलेले अंडे खाणार आहे. तेवढे घेऊन आलोय."
मी जेव्हा त्यांना सांगितले की आपण ज्या वाटेने जाणार आहोत त्यात दुकाने तर सोडाच पण माणुसपण दिसेल का नाही सांगता येणार नाही. दिवसा ढवळ्या गेलो असतो तरी एखाद वेळी शक्यता होती पण आता अशा पावसाळी रात्री काय डोंबल मिळणार आपल्याला खायला.
हे ऐकताच सगळ्यांचा धीर खचला. तरीपण निखिलचा निर्धार ठाम होता. त्याच्यानुसार जर भराभरा पावले टाकली तर लवकर सिंहगडावर पोहचू आणि तिथे मिळेलच काहीतरी.
माझ्या त्यांच्याकडून असे काही होण्याची अजिबात आशा नव्हत्या, पण असाही दुसरा काही पर्यायच नव्हता. कात्रज बोगदा गेल्यानंतर जेव्हा उतरलो तेव्हा नऊ वाजून गेले होते. लगोलग चढायला सुरूवात केली. सिंहगडावर गेल्याशिवाय खायला मिळणार नाही हे कळाल्यामुळे की काय पण मंडळीपण भराभरा पाय उचलत होती. अर्थात त्यांचा उत्साह जेमतेम १५ मिनिटे टिकला आणि मग हल्या हल्या सुरू झाले.
थोडा वेळ चालावे आणि जास्त वेळ बसावे अशा प्रकाराने लवकर सोडा आपण सिंहगडला पोचू तरी का नाही याबाबत शंका वाटायला लागली. रात्री साडेदहाच्या सुमारास माझ्या डब्यातली पोळी-भाजी आणि चवीपुरते उकडलेले अंडे खाऊन पुढे निघालो. दरम्यान मंडळींनी पाण्याच्या बाटल्यापण संपवून टाकल्या होत्या. आता सिंहगडावर पोहचेपर्यँत खाणे-पिणे काहीच मिळणार नव्हते. तरीही अंतर फार नाही म्हणत चालत राहीलो.
अंधारी पावसाळी रात्र, चांगलेच उंच वाढलेले गवत आणि संगतीला ही मंडळी अशा वैतागात मी कसा कोण जाणे वाट चुकलो. एरवी सिंहगडवरच्या टॉवरवरचा लाल लाईट दिसतो, पण त्यावेळी ढगांमुळे काहीच दिसत नव्हते. त्यात भर म्हणजे बॅटरीने जीव टाकायला सुरूवात केली. अर्थातच माझ्याकडे आणि निखिलकडेच बॅटरी होती. आता मात्र काळजी वाटायला लागली.
कसेबसे ठेचकाळत आम्ही एका अशा ठिकाणी आलो कि तिथून उतरायला काहीच जागा नव्हती. पण परत मागे जाण्यापेक्षा आहे त्या वाटेवरून पुढे जाऊ म्हणून जपून जपून उतरायला सुरूवात केली. पाहुण्यांनी मात्र खाली बसून घसरत येणेच पसंद केले. निम्म्या वाटेवर आलो मात्र आणि लक्षात आले की वाटले त्यापेक्षा ही वाट जास्त धोकादायक आहे. आता मात्र पक्के अडकलो, धड खाली उतरता येईना आणि वर चढणे अशक्य होते. जिथे होतो तिथे नीट उभे रहायलाही जागा नव्हती.
हे कमी म्हणून का काय पावसाची रीपरीप चालू झाली. शेवटी मी आणि निखिल वाट शोधायला म्हणून पुढे निघालो. थोडी शोधाशोध केल्यानंतर किमान खाली उतरता येईल अशी जागा सापडली. ही आनंदाची बाब सांगण्यासाठी मागे आलो तेव्हा मला त्या अवस्थेतही हसू आल्याशिवाय राहीले नाही. त्या अरूंद अशा जागेवर जशी जागा मिळेल तशी ही मंडळी बसली होती. आणि प्रत्येकाने हातात एक एक कासवछापचा तुकडा पेटवून धरला होता. त्या दाट झाडीत मजबूत किडे आणि डास-माश्या होत्या त्यांच्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी ही अशी आयडीया केली होती. बिच्चारे.
तर अशी ही वरात घेऊन धडपडत खाली आलो. थोडी सपाटी लागली तेव्हा जरा बरे वाटले. नंतर लक्षात आले काही आम्ही सिंहगडच्या घेऱ्यातील एका गावात पोहचलो आहोत. म्हणजे आता मूळ कात्रज-सिंहगडची वाट सोडून आम्हाला डांबरी रस्त्याने गडावर पोचावे लागणार होते. ठिक आहे, किमान वाट तरी चुकणार नाही असे म्हणत पुढे चालू लागलो.
थोडे पुढे गेल्यानंतर शेतजमिन लागली, भक्कम कुंपण घाललेली. आता हे ओलांडून कसे जाणार या विचारात असतानाच दूरवर शेतात एक मानवाकृती दिसली. बहुदा रात्रीचा राखणदार असावा.
आम्ही दोन-तिन हाळी टाकल्या - काका, मामा वगैरे. पण काहीच उत्तर नाही.
"आम्ही अडकलोय इथे, कुठून जाऊ?"
तरीपण काही उत्तर नाही. उगाच कशाला डोक्याला ताप म्हणून आम्ही त्या शेताच्या बाजूबाजूने जायला सुरूवात केली पण लक्ष त्या माणसाकडेच होते. कहर म्हणजे तो जागचा हलला पण नाही. पुढे जाताना शेतात जायची वाट सापडली आणि थोडे पुढे जाताच त्याच्यावर लाईट टाकला आणि मगापासून तो गप्प गप्प का होता त्याचे कोडे उलगडले. आम्ही मगापासून एका बुजगावण्याशी बोलायचा प्रयत्न करत होतो.
आता या गोष्टीची गंमत वाटतीये, पण त्यावेळी तो माणून बोलत का नाहीये हे न कळाल्यामुळे जाम टेन्शन आलो होते. गाव ओलांडून पुढे आलो तेव्हा बॅटरीने उरला सुरला जीव टाकला. त्यावेळी रात्रीचे सुमारे दोन वाजले असावेत. अजून सिंहगडच्या डांबरी रस्त्याला लागायला खडी चढण चढून जावी लागणार होती. सुदैवाने आम्हाला घाटातून जाणाऱया गाड्यांचे लाईट दिसले त्यामुळे किमान अंदाज आला.
आता पाऊसही थांबला होता तेव्हा एक अजब उपाय निघाला. माझ्याकडे २-३ मेणबत्या होत्या. त्या पेटवल्या आणि त्या प्रकाशात पुढे निघालो.
त्या रात्री जर आम्हाला गावातल्या कोणी पाहीले असेल तर त्याला काय वाटले असेल देव जाणे. विचार करा, रात्रीच्या दोन अडीच वाजता २-३ मेणबत्त्या सिंहगडच्या दिशेने जातायत असे दृश्य दिसले असते तर आपले काय झाले असते.
असो. पुढे चांगलीच चढण लागली आणि एका हातात मेणबत्ती घेऊन चढणे शक्य होईना, अनेकवेळा जळते मेण हातावर पडून हाताचीही वाट लागली होती. शेवटी निखिल पुढे झाला. थोडा वेळ चढून गेला की तो शिट्टी वाजवायचा आणि आम्ही शिट्टीच्या दिशेने अंधारात चालू पडायचो. रात्रीच्या पावसाने छानपैकी चिखल झाला होता. वाट अशी नव्हतीच. त्यामुळे अक्षरश चिखलात लोळून निघालो होतो. दुबईवाल्यांची अवस्था तर सांगण्यापलीकडे गेली होती. त्यांच्या भाषेत बहुदा आम्हाला भरपूर शिव्याही घालून झाल्या होत्या. मी त्यांची परिस्थिती समजू शकत होतो. वैष्णोदेवीच्या अपेक्षेने आलेल्यांना सह्याद्रीत चुकीच्या वेळी चुकीच्या वाटेने आणल्यानंतर दुसरे काय करणार. त्यातही रात्री एकच पोळी खाल्लेली आणि गेले काही तास पाण्याचा थेंबही मिळाला नव्हता.
असेच तडफडत कसेबसे डांबरी रस्त्याला लागलो तेव्हा सगळ्यांनी एकमेकांना मिठ्या मारून आनंद व्यक्त केला. दुबईवाल्यांचे तर अंदमानच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेतून सुटल्यासारखे चेहरे झाले होते. बिचाऱ्यांना त्यावेळी माहीती नव्हते की अजून गडावर पोचायला पाच किमीचा रस्ता तुडवावा लागणार आहे. सह्याद्रीत इतरवेळी काही वाटत नाही पण ही डांबरी रस्त्यावरील फरफट जीव नकोसा करते.
हाश हुश फास फुस्स करत गडावर पोहोचलो तेव्हा उजाडले होते. सगळ्यांचे चेहरे, कपडे चिखलाने माखलेले, हातावर, तोंडावर छानपैकी ओरखाडलेले. अहाहा काय दृश्य होते ते.
गेल्या गेल्या जी टपरी लागली तिथे पिठलं-भाकरी, भजी, चहा अशी भरगच्च ऑर्डर गेली.
तिथल्या मावशींनी आमच्या अवस्थेकडे पाहून कुतुहलाने विचारले कुणीकडून आला.
"हे काय कात्रजवरून"
"ते बी चालत, कशापायी?"
आता या गावाकडच्या बाईला ट्रेकिंगची गंम्मत काय कळणार कप्पाळ असा विचार मनात आला.
"काही नाही असेच जरा चालायचे होते."
"अव पन तुम्हास्नी ठावं नाही का. दोन दिस झाले गावात वाघरू दिसतय. आम्हीबी गाडीसंगच येतो. रात्रीच्या येळी तर बाहेरसुंदा पडत नाही."