Thursday, October 6, 2011

कोकण भटकंती बाईकवरून भाग १

प्रास्ताविक...गेल्या आठवड्यात मी आणि माझा मामेभाऊ कोकणात बाईक भ्रमंती करून आलो....सागरी किल्ले पाहणे हे प्रमुख उद्दीष्ट असल्याने आम्ही बाकी अनेक निसर्गरम्य ठिकाणांपाशी जास्त काळ थांबलो नाही...
अलीबागपासून सुरूवात करून ते गणपतीपुळ्याजवळील जयगडपर्यंत असे एकूण ११ किल्ले या भ्रमंतीत पाहिले...
(त्यातील निवडक किल्लेच आता उरले आहेत. बाकिचे केवळ अवशेष आणि तेही शोधून काढावे लागतात...असो)
पुणे ते पुणे असे एकूण ९५० किमी ची भ्रमंती झाली....आणि माझ्या होंडा युनिकॉर्नने या सफरीत मोलाची साथ दिली...आमच्या दोघांचे आणि सामानाचे असे जवळपास १६० कि. चे वजन सहजी पेलून गाडीने कोकणातल्या तीव्र चढ उतारांवर अजिबात त्रास दिला नाही...आणि येताना सातारा-पुणे महामार्गावर तर तब्बल ११५किमी च्या वेगाने पळवली....

दिवस पहिला....
भल्या पहाटे जेव्हा पुण्याहून जर्कीन, ग्लोव्हज, हेल्मेट परिधान करून अलिबागच्या दिशेने सुटलो तेव्हा हवेत एक सुखद गारवा होता..सूर्यमहारांजाचे आगमन व्हायचे होते आणि हायवेवर रहदारीही फारशी नव्हती....
त्या संधीचा फायदा घेऊन जे बाईक सुसाट पळवली ती थेट लोणावळ्यापर्यंत...घड्याळात पाहिले तर जेमतेम एका तास झाला होता.
मग तिथल्याच आमच्या फेवरिट 'अन्नपूर्णा' हॉटेलमधून भरपेट नाष्टा करून आगेकूच केली. आता उकाडाही वाढत चालला होता आणि रहदारीही...पण गाडीचा वेग कमी करावा लागला नाही आणि पेण मार्गे अलिबागजवळ येऊन ठेपलोही...तिथे जातानाच आम्हाला 'थळ ८ किमी' असा बोर्ड दिसला...थळजवळ खांदेरी-उंदेरी किल्ले आहेत माहीती होते पण ते आमच्या वेळापत्रकात नव्हते..पण फक्त आठ किमी अंतर असेल तर दोन किल्ले पदरात पडतील या हिशोबाने गाडी तिकडे वळवली...
हे दोन्ही किल्ले समुद्रात आतवर असल्याने बोटीनेच जावे लागते. पण फारसे पर्यटक इथे येत नाहीत त्यामुळे नावाडी ठरवून त्यानुसार जावे लागते. त्यामुळे थळपाशी जाताच आम्ही नावाडी शोध मोहीम हातात घेतली. सुदैवाने एक अविनाश बोचके म्हणून नंबर मिळाला. त्याला फोन लावल्यानंतर त्याने विचारणा केली..आम्ही दोघेच आहोत म्हणल्यावर त्याने डायरेक्ट १०००रु मागितले...
मग घासाघिस सुरू...नाय होय म्हणता ५०० रुपयांवर सौदा तुटला...
"मी आत्ता एका ग्रुपला घेऊन किल्ल्यात गेलो आहे..तासाभरात येतो..."
मग तिथल्याच किनार्‍यावर गेलो आणि सुकट मासळीचा दर्प नाकात घुसला..बापरे...
अगदी असह्य वास होता तो. इथून पुढे याच वासाची सवय करावी लागणार आहे असे म्हणत तिथेच ठाण मांडले...
दरम्यान, जवळच्या एका घरापाशी बाईक लावली. तिथली एक षोडषवर्षा आम्हाला पाहून पुढे आली. मग सगळे पुराण ऐकवले. आम्ही दोघेच असे बाईकवरून आलो म्हणल्यावर ती अगदीच प्रभावित झाली. मग सामान आणि हेल्मेट ठेवण्यासाठी एक खोली उघडून दिली. बोट कुठे थांबते हे नुसते रस्ता दाखवून थांबली नाही तर टळटळीत उन्हात आमच्याबरोबर चालत आली आणि वर एवढ्या उन्हात बसण्यापेक्षा घरीच बसा असे अधिकाराने सांगितलेही..
(माझे पिकलेले केस आणि सुटलेले पोट पाहून माझ्यापेक्षा अमेयकडेच जास्त तिचा ओढा असावा असा माझा अंदाज स्मित )
मग तिथल्याच कोळ्यांच्या पोरांबरोबर क्रिकेट खेळत वेळ काढला.

एकाचे दोन तास झाले तरी या माणसाचा पत्ता नाही. फोन करतोय तर उचलायला तयार नाही..
दरम्यान, अजून एक जण पुढे येऊन ठाकला.
"कुठं जायचं, किल्ल्यात?"
"हो, त्या अविनाश बोचकेंबरोबर चाललोय"
"मी पण घेऊन जातो की, ५०० रुपये लागतील"
"अहो पाचशेमध्ये तर बोचके घेऊन चाललेत, तुम्ही ४०० मध्ये नेणार का?"
"चला नेतो."
आम्ही वेळ आणि शंभर रुपडे वाचल्याच्या उत्साहात निघालो तर ती मस्यकन्या वेळेवर धावली..
"अहो जाऊ नका त्याच्याबरोबर, तो दारूडा आहे, किल्यात सोडून पळून जाईल.".
आणि एवढ्यावर ती थांबली नाही, तिने त्याला जाम शिव्या-बिव्या घालत हाकलून दिले.
बापरे, हे कायतरी भयंकरच होते.
शेवटी अडीच एक तासांनंतर तो बोचके उगवला. आम्ही भराभर कॅमेरे उचलून निघालो तर थंड स्वरात म्हणाला..
"अहो आपले अजून हिशोबाचे बोलणे झाले नाही.."
मला काय टोटलच लागेना. आता परत कसले हिशोबाचे बोलणे..
"पाचशेत परवडत नाय आम्हाला, हजार रुपये लागतील.."
आता माझे टाळके सणकले..आणि जो मी पट्टा सोडला..
"मग हे आधी बोलणे झाले तेव्हा काय कान वाजले होते का. तेव्हा कशाला म्हणाला पाचशेत सोडतो. आणि आता अडीच तास थांबायला लाऊन निर्लज्जपणे सांगतोय. आम्ही काय &*^% म्हणून थांबलो का? किल्ला काय तुझ्या %^&^% का च्यायला, अशी लूटमार करता का तुम्ही. नव्हते परवडत तर तेव्हाच थोबाड उचकटून बोलायचे..इइ. "
एवढे बोलल्यानंतर मला वाटले आता "तुझ्या आवशीचा." पासून सुरुवात होणार. पण काय नाय त्याने थंडपणे माशांची जाळी उचलली आणि चालता झाला.
माझा संताप अजूनही कमी झालेला नव्हता आणि मी त्याच्या मागोमाग तणतणत गाड्यांपाशी आलो. तरीही काहीही फरक नाही.
उद्विग्न मनाने गाडी काढली आणि अलिबागकडे सुटलो. ती मस्यकन्यापण कुठे गायब झाली होती देव जाणे.
आपण मूर्ख बनवलो गेल्याची भावना त्रस्त करत होती आणि अनेक हिंसक विचार मनात येत होते.
थोडक्या वेळातच अलिबागपाशी पोचलो...
अलीबागपासून कुलाबा किल्ला अगदी जवळ आहे आणि ओहोटी असेल तर किल्ल्यात चालत पण जाता येते.
असा अंदाज होता की ओहोटीची वेळ साधून चालत जाता येईल पण गेल्यानंतर कळाले की ओहोटीची वेळ टळून गेली त्यामुळे झक मारत प्रत्येकी ८० रुपये भरून बोट केली. पण किल्ल्यात गेल्यानंतर मात्र दिवसभरच्या श्रमाचे सार्थक झाले.
अतिशय देखणा किल्ला आहे.. १६८० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला वसवला. त्यानंतर मायनाक भंडारी या पहिल्या दर्यासारंगाने किल्ला झुंजता ठेवला. असे म्हणतात की किनाऱ्यावरील तोफांचा मारा प्रवेशद्वारावर होऊ नये म्हणून संभाजी महाराजांनी सर्जेकोट बांधला. हा एक छोटेखानी किल्लाच आहे.
सर्जेकोट किल्ला..यालाच किल्ल्याचा सतरावा बुरूज असेपण म्हणतात..



कुलाबा किल्ला आता पुरातत्व खात्याच्या अधिकारात आहे आणि किरकोळ प्रवेशमूल्य आकारले जाते.
हा किल्ला नंतर कान्होजी आंग्रे यांचे प्रमुख केंद्र बनला. परकीयांवर दरारा बसविणाऱया मराठमोळ्या गुराबा बोटी देखील इथे बांधल्या जात अशी माहीती मिळाली. या किल्ल्याने अनेक लढाया पाहिल्या आणि यशस्वीपणे तोंड दिले. परंतु अखेर वंशकलहात त्याची वाताहात झाली आणि वारस नसल्याचे दाखवत इंग्रजांनी किल्ला बळकावला.




सिद्धिविनायक मंदीर
या मंदिरात गणेशमूर्तीबरोबर सूर्य आणि इतरही देवतांच्या मूर्त्या आहेत. त्यामुळे याला गणेश पंचायतन म्हणून ओळखले जाते आणि चतुर्थीला इथे प्रचंड गर्दी होते.


किल्ल्यावरून जाणारे एक हेलीकॉप्टर

दर्या दरवाजा



त्यानंतर परत अलिबागला आल्यावर किल्ल्याच्या बॅक़ड्रॉपला सुंदर असा सूर्यास्ताचा देखावाही मिळाला.



पर्यटकांची बेसुमार गर्दी नसती तर तो अजून सुंदर वाटला असता...
असो, तिथून पुढचे ठिकाण होते कोर्लईचा किल्ला..त्यासाठी अंधार पडला तरी रेवदंड्याला पोचणे भाग होते. मग त्या खडबडीत रस्त्यावरून जेव्हा रेवदंड्याला पोहोचलो तेव्हा जाणवले की सकाळी आठ वाजता केलेल्या नाष्ट्यानंतर काहीच खाल्लेले नाही.
मग तिथल्याच एका खानावळीत घुसलो. आधी थाळी संपवली मग एक्सट्रा चपात्या, भाजी असे भस्म्या झाल्यासारखे खात सुटलो. शेवटी ती बाई येऊन म्हणाली
"बाळा भाजी संपली.."
"अजून काय आहे का खायला..?"
रस्स्यात घालायचे टॉमॅटो आहेत फक्त
"चालतील द्या.."
मग त्या टोमॅटोंवर तिने फोडणी घालून भाजी म्हणून दिली.
नंतर पोळ्यापण संपल्या.
"भात आहे ना..आणा तोच"
शेवटी भातपण संपला तेव्हा मात्र उठलो..आणि अत्यंत जडावलेल्या शरीराने एका घरगुती गेस्टहाऊसमध्ये अंग टाकून दिले....
क्रमश...

कोकण भटकंती बाईकवरून भाग २

दिवस दुसरा - इच्छाशक्तीचा विजय
दुसरे दिवशीची पहाट उगवली तीच वाईट प्रकारे. आदले दिवशीचे आचरटासारखे खाणे किंवा बदललेले पाणी यामुळे पोट जाम बिघडले होते आणि फेर्‍या सुरू झाल्या होत्या.
अर्थात, एक गोळी घेऊन बरे वाटेल अशी समजूत घालून कोर्लई किल्ल्याकडे रवाना झालो.
रेवदंडा खाडीवरील पहाट

पोर्तुगिज हे पहिले युरोपियन आक्रमक आणि सर्वात शेवटपर्यंत टिकून असलेलेही. रेवदंडा, चौल आणि कोर्लई इथे त्यांचे चांगलेच वर्चस्व होते आणि अजूनही अनेक ठिकाणी त्याच्या खुणा आढळतात. इतकेच काय या भागात चिश्ती म्हणून एक भाषा बोलली जाते (मराठी आणि पोर्तुगिज भाषेचा संकर असलेली). ही भाषा ऐकण्याची जाम इच्छा होती पण ते काही शक्य झाले नाही.
रेवदंड्यातून गाडीरस्ता खाडी ओलांडून थेट किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लाईट हाऊसपर्यंत पोचतो. तिथून थोड्या पायर्‍या चढून गेले की किल्ल्याचे प्रवेशद्वार सामोरे येते.


किल्ला अजूनही सुस्थितीत आहे आणि अनेक दरवाजे (चार बाहेरचे आणि सात आतले), बुरुज, तोफा, मंदिर, चर्च असे सगळे काही आहे.



इतर सागरी किल्ल्यांसारखा हा भुईकोट किंवा जंजीरा नसून एका टेकडीवर आहे त्यामुळे पोर्तुगिजांना पाय रोवताना या किल्ल्याची चांगलीच मदत झालेली असणार हे जाणवते. पूर्वी या किल्ल्यावर सुमारे ७० तोफा होत्या पण आता अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच उरल्या आहेत.


संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घ्यायचा अयशस्वी प्रयत्न केला आणि नंतर चिमाजीअप्पांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याने हा किल्ला जिंकला. त्यावेळी किल्ल्याच्या बुरुजांची पोर्तुगिज नावे बदलून मराठमोळी गणेश, लक्ष्मी अशी नावे देण्यात आली होती. किल्ल्याला एकूण सात बुरूज आहेत.



पोर्तुगिज शिलालेख...मधल्या जागेत सात किल्ले दिसतायत. असे म्हणतात भारतातील सत्तेचे ते प्रतिक होते. नक्की खुलासा जाणकार करू शकतील.






किल्ला पाहताना मी पोटामुळे अस्वस्थच होतो आणि जसाजसा वेळ जाऊ लागला तसा माझी अवस्था बिकट होऊ लागली. त्यामुळे फारसा वेळ न घालवता आणि लाईट हाऊस पाहण्याची इच्छा डावलून रेवदंड्याचा मार्ग पकडला.

डीहायड्रेशन होऊ नये म्हणून वाटेत बिस्लेरी वॉटर आणि इलेक्ट्रॉल घेऊन त्याचा मारा सुरू केला. रेवदंड्याला पोहोचलो तरी फेर्‍या थांबेनात आणि असह्य कळाही सुरू झाल्या आणि जाणवले हे नुसते पोट बिघडणे नाही.
त्या छोट्याश्या गावात कसाबसा एक डॉक्टर मिळाला आणि सुदैवाने तो चांगला निघाला. त्याने सगळी लक्षणे विचारून घेतली आणि पाण्यामुळे इन्फेक्शन झाले असावे असे निदान केले.
मग आता.....?????
"काय घाबरू नका, आज रात्रीपर्यंत ठीक व्हाल. आता तातडीने जुलाब थांबवण्याची गोळी दिली तर उलट्या सुरू होतील. इन्फेक्शन निघून जाऊ दे, मग फ्रेश व्हाल,"
"अहो पण आमचा आज मुरुड-जंजिरा पाहण्याचा बेत आहे."
"मला वाटतं, तुम्ही या अवस्थेत फार दगदग करू नका, विश्रांती घ्या चांगली."
मग त्याचे म्हणणे ऐकून प्लॅनमध्ये बदल करून आजचा दिवस रेवदंड्यातच काढून दुसरे दिवशी मुरुडला कूच करण्याचे निश्चित केले. पण कळा थांबण्याचे नाव घेत नव्हत्या. अगदीच असह्य झाले तेव्हा घरी फोन केला. अपेक्षेप्रमाणेच बायकोने तातडीने घरी येण्याचा हुकूम सोडला.
"अजून जर तब्येत बिघडली तर त्या गावात काय करणार. आणि तिथे खायचे-प्यायचे हाल होणार. का उगाच जीवाला त्रास करून घेतो."
मलाही ते पटत होते कारण अवस्था तर आता कधीही अॅडमिट करावे लागेल अशीच होती. सकाळपासून १५-१६ वेळेस जाऊन आलो होतो आणि एकथेंबही पोटात रहात नव्हता. आणि त्या आडगावी अॅडमिट होण्याची माझी तरी तयारी नव्हती. शेवटी दु:खी मनाने पॅक-अप करण्याचा निर्णय घेतला.
सॅक पाठीवर घेतली आणि पुण्याच्या दिशेने निघालो. पण एक रुखरुख मनात दाटत होती. मोठ्या मुष्किलीने सुट्टी मिळाली होती आणि जर पु्ण्याला जाऊन बरा झालो रात्रीपर्यंत तर हा ट्रेक पुन्हा करणे शक्य होणार नव्हते.
अत्यंत दोलायमान स्थिती...टू बी ऑर नॉट टू बी...
शेवटी इच्छाशक्तीने मात केली आणि अमेयला गाडी थांबवायला सांगितली.
"हे बघ, त्या डॉक्टरने सांगितले आहे की रात्रीपर्यंत बरे वाटेल. सो आपण चान्स घेऊ. इथून मुरूडला जाऊ, इथल्यापेक्षा तिथे सोय चांगली असेल. काय वाटलेच तर उद्या सकाळी निघून जाऊ पुण्याला परत."
मग वडलांना फोन केला आणि त्यांना सर्व परिस्थिती कथन केली.
"काय होत नाही रे, जा बिनधास्त. गोळ्या घे व्यवस्थित."
त्यांच्या या शब्दांनी खूपच धीर आला आणि वाटेत दिसेल तिथे शहाळपाणी पीत मुरूड गाठले.
गोळ्यांचे दोन डोसपण पोटात गेल्यामुळे कळा खूपच कमी झाल्या होत्या आणि फेर्‍यांची संख्यापण रोडावली होती. रात्री मुरूडला जेव्हा पोचलो तेव्हा सगळीकडे लाईट गेले होते आणि पावसाचे थेंब पडायला सुरूवात झाली होती.
कसेबसे एक रेस्टहाऊस गाठले आणि घासाघिस करून खोली पटकावली. मग जवळच्याच एका हॉटेलमध्ये अमेयने मनसोक्त मासे हादडले तर मी फक्त पातळ वरण-भातावर भागवले.
दोन दिवसात फक्त दोनच किल्ले झाल्यामुळे आमचे प्लॅनिंग तसे बोंबललेच होते पण प्लॅन कॅन्सल न होता पुढे जाऊ शकू या आनंदात छानपैकी पडी टाकली.
(दरम्यान, बायकोने फोनवरून खरडपट्टी काढलीच होती पण ती कानापलीक़डे टाकण्याची किमया खूप आधीपासूनच साधली होती.)

कोकण भटकंती बाईकवरून भाग ३

दिवस तिसरा - गेले दोन दिवस फक्त दोनच किल्ले झाल्यामुळे आज बरीच धावपळ करावी लागणार होती. आजच्या दिवसात जंजिरा मग दिवेआगर, हरिहरेश्वरमार्गे बाणकोट किल्ला करून केळशीला पोचण्याचा बेत होता. त्यामुळे फारसा वेळ न घालवता पटापट आवरून राजापुरीला पोचलो.
इथे बोटवाल्यांची बरीच मनमानी चालते आणि जेमतेम ४५ मिनिटे किल्ल्यात जायला मिळतात. आता जंजिर्‍यासारखा किल्ला केवळ पाऊण तासात उरकायचा म्हणजे नुसतीच धावाधाव होते, किल्ल्या पाहल्याचे समाधान काय मिळत नाही. पण अजूनतरी याला काहीही पर्याय नाहीये.
मस्त शिडाच्या बोटीत बसून जेव्हा आम्ही निघालो तेव्हा माझ्या डिस्कव्हरीच्या कॅपकडे आणि आमच्या कॅमेरा ब्यागांकडे पाहून दोघातिघांनी तुम्ही च्यानेलकडून आलाय का अशी विचारणा करत आमचा भरपूर टाईमपास केला.
जंजिरा किल्ला आहे एकदम जबरदस्त आणि दुरुनही त्याचे दर्शन धडकी भरवणारे आहे. बोटीतून जाताना अगदी जवळ जाऊन ठेपल्याशिवाय त्याचे प्रवेशद्वार मुळीच दिसत नाही. स्थापत्यशास्त्राचा एक अदभुत नमुना हे याचे वर्णन सार्थ आहे.





पाऊण तासात आम्ही फोटोच्या नादात निम्मापण किल्ला पाहू शकणार नाही याची खात्री होती त्यामुळे जास्त शहाणपणा न करता गाईड ठरवला आणि तो सांगत असलेल्या अतिशयोक्त बडबडीकडे फारसे लक्ष न देता महत्वाची ठिकाणे पाहण्याचा सपाटा लावला.
(इथले गाईड इतके हुशार आहेत की ते बोटीतच येतात आणि जातानाच प्रवाशांना घाबरवतात की जर पाऊण तासात तुम्ही परत नाही येऊ शकला तर अडकून पडाल. किल्ला एवढा मोठा आहे की तुम्ही कुठे हरवून बसाल हेच तुम्हाला कळणार नाही. अर्थातच मग सगळेजण गाईड ठरवतात)




गायमुख तोफ

चावरी

आणि इतिहासप्रसिद्ध कलाल बांगडी. या तोफेचा पल्ला १२किमी पर्यंत आहे असे म्हणतात आणि कितीही उन असले तरी तोफ अजिबात तापत नाही. एक आख्याईका अशी की, पेशव्यांनी किल्ला जिंकण्यासाठी ही तोफ आणवली होती पण किल्ला जिंकता न आल्याने निराश होऊन त्यांनी ती तशीच सोडून दिली. तिच पुढे सिद्दीने किल्ल्यात आणवली. तर काहींच्या मते ती इतकी जड होती ही ती बोटीने आणणे अशक्यप्राय होते. त्यामुळे ती तुकड्या तुक़ड्यात आणून इथे जोडण्यात आली.






किल्ला पाहून परत आलो आणि कळले की दिघीला जाणारी मोटारलॉँच केवळ दहा मिनिटात सुटणार आहे. आम्ही किल्ल्यात जाताना सॅक आणि हेल्मेट कशाला म्हणून रात्री जिथे उतरलो होतो त्याच रेस्टहाऊसमध्ये सॅक ठेऊन आलो होतो.
मग जिवाच्या आकांताने ते आठ किमी अंतर पार करून सॅक आणि हेल्मेट उचलून कसेबसे वेळेआधी पोचलो.
मग पहिल्यांदा माझी युनिकॉर्न तिच्या सागरी सफरीवर निघाली आणि आम्ही बोटीच्या टपावर प्रस्थान मांडले.



दिघीला पोचल्यावर तिथल्या धक्कयावरच एक ओळखीचे गृहस्थ भेटले. आम्ही जंजिरा करून आलो तेव्हा एकदम त्यांनी पिंक टाकली.
"तिकडे तर मला जायची पण इच्छा होत नाही."
मला वाटले नावाड्यांच्या मनमानीपणाचा राग आला असेल. पण पुढचे वाक्य भारीच होते.
"अहो काय बघणार त्या किल्ल्यात, शिवाजी महाराजांना जिंकता आला नाही. फार दुख होते त्यामुळे बघावासाच वाटत नाही. जिथे ते जाऊ शकले नाहीत तिथे आपण कशासाठी जायचे?"
शिवाजी महाराजांबद्दल सर्व आदर ठेऊन सांगतो मला त्यावेळी एकदम हसूच आले. पण गंभीर मोड ऑन ठेऊन बोललो,
"अहो म्हणूनच पहायचा. महाराजांसारख्या धुरंधर माणसालाही जिंकता आला नाही म्हणजे नक्कीच काहीतरी असणार ना विशेष."
पण त्यांना काय ते पटेना, शेवटी मीच माघार घेतली पण जाताजाता पिल्लू सोडून दिले..
"बरोबर आहे, मलाही आता हे ऐकल्यावर जंजिरा आणि शिवनेरीला जायची इच्छा होणार नाही."
त्यावर एकदम बिचकले, शिवनेरीला काय आहे..
"अहो शिवनेरीपण जिंकता आला नव्हता महाराजांना कधी..."
त्यांना चेहर्यावरचा अविश्वास लपवणे कठीण झाले होते.
"अहो असे कसे होईल त्यांचा जन्म झाला होता तिथे".
मग त्यांना थोडक्यात सगळा इतिहास कथन केला. आणि आपत्तीत पडल्यासारखा चेहरा करून ते निघून गेले. स्मित
दिघीवरून दिवेआगर आणि श्रीवर्धनला वेळ न घालवता थेट हरिहरेश्वर गाठले. देवळात पटापट दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला लागलो. इथून वेळासला जाणारी लॉँच तर भलीमोठी अगदी कार वगैरे घेऊन जाणारी होती. अशा प्रकारे प्रवास करण्याचा आमचा पहिलाच अनुभव होता त्यामुळे खूप उत्साहात फोटो वगैरे काढले.

पण माझ्या कॅमेराच्या बॅटरीने दगा देण्यास सुरूवात केली होती त्यामुळे इथून पुढे खटाखट फोटो उडवून चालणार नव्हते.
वेळासवरून कमालीचा चढ असेलला रस्ता पार करून बाणकोट किल्ला गाठला. शेवटच्या टप्प्यात तर इतका चढ होता की गाडीवरील वजन कमी करण्यासाठी आम्ही तिथल्याच एका पोलिस चौकीत सॅक ठेवली आणि पुढे गेलो. अर्थातच गाडीने शून्य त्रास दिला आणि माज करत अगदी किल्ल्य्याच्या दारापर्यंत नेऊन बाईक पार्क केली.

बाणकोट किल्ला दिसायला एकदम देखणा आहे पण किल्ल्याचा इतिहास फारसा नाही. तुळोजी आंग्रे पेशव्यांना जुमानेसे झाले तेव्हा पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने त्यांचा पाडाव केला आणि किल्ला इंग्रजांना देऊन टाकला. परंतु, किल्ला फारसा फायद्याचा न ठरल्याने त्यांनी तो पेशव्यांना परत केला.
आता किल्ल्यात काही उरलेले नाही. त्यामुळे भिंतीचे आणि मुख्य दरवाज्याचे फोटो काढण्यावरच समाधान मानावे लागले.










आता मुक्कामाचा टप्पा होता निसर्गसुंदर केळशी. रस्ता विचारत विचारत गावात जेव्हा पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती आणि आमच्या दुर्दैवाने संपूर्ण गावात वीज गायब होती. आदले दिवशी आणि दुपारीसुद्धा मजबूत पाऊस झाल्याचे जाणवत होते. त्या अंधारात पाखाडीवरून गाडी चालवत विद्वांस यांचे घर शोधणे हा एक दिव्य प्रकार होता. बर गावात एकही मोबाईल टॉवर नाही त्यामुळे फोनवर कोणाला विचारावे तर तेही शक्य नाही.
लाईट नसल्याने काही जण बाहेरच वारा खात बसले होते त्यांना विचारत विचारत शेवटी घर सापडले. त्यांच्या समोरून किल्ली हस्तगत केली आणि दार उघडले तोच दोन वटवाघळे एकदम उडून गेली.
बापरे ईतका दचकलो. ते घर अनेक महिन्यांपासून वापरात नाही. त्यामुळे आत काय असेल याची कल्पना करवेना. आधी बॅटरीच्या उजेडात कुठे काय साप-किरडू वगैरे नाही ना याची खात्री केली. तरीपण तिथे अंधारात बसण्याचे धाडस होईना. जेवायला अजून वेळ होता त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर जायचा प्लॅन आखला. अंधारात गुढगाभर पाण्यात जाऊन उभारलो तरी लाटांचा पत्ता नाही, नुसताच आवाज.
त्यामुळे इतके विचित्र फिलींग येत होते. नंतर उलगडा झाला की भरतीच्या वेळी आलेल्या पाण्यामुळे भरलेल्या एका खोलगट भागात उभे होतो. मग अजून थोडे आत जाऊन लाटा अनुभवल्या. त्या अंधाऱ्या रात्रीचा समुद्रकिनारा एकदमच वेगळा वाटला. एकतर सगळीकडे मिट्ट काळोख, त्या निर्मनुष्य किनाऱ्यावर आम्ही दोघेच, लाटांचा आवाज सोडला तर एकदम नीरव शांतता आणि किनाऱ्याच्या बाजून असेलेली गर्द वृक्षराई...
देवाशपथ सांगतो...एका अनामक भितीचा शहारा उमटून गेला मनात. तिथे घाबरण्यासारखे काहीच नव्हते पण कुठल्यातरी अनामिक भितीने उगाचाच थोडे घाबरल्यासारखे झाले. बराच वेळ असा टाईमपास करून गावात परतलो तरी लाईट येण्याचा काही पत्ता नाही.
शेवटी अंधारातच एक घरगुती खानावळ शोधून काढली. आत जाऊन बसलो तर समोरच दोन माणसे छानपैकी झोपलेली आणि त्या बाईने आम्हाला तिथेच बसा म्हणून ताटं मांडली. आता समोर अशी माणसे झोपलेली असताना मला खायला काहीतरीच वाटायला लागले. ते त्या बाईला जाणवले असावे
"ते रिक्षा चालवतात, माझा मुलगा आणि त्याचे वडील..आज लांबचे भाडे घेतले म्हणून दमून झोपलेत. तुम्ही जेवा निवांत."
जेवण अगदी आटोपशीरच होते. गरमा-गरम पोळ्या, फ्लॉवर बटाटा रस्सा, चटणी आणि नंतर आमटी भात. पण एकतर कडकडून भूक लागलेली आणि अन्नाला एक सुरेखच चव होती. त्यामुळे पुन्हा एकदा 'भस्म्या मोड'मध्ये गेलो. त्या काकू वाढतच राहील्या आणि आम्ही काय थांबा म्हणायचे नावच घेत नव्हतो. तो भातदेखील इतका स्वादिष्ट होता की पहिल्यांदा एवढा भाताचा डोंगर संपवला असेल.
आता इतके जेवण झाल्यावर निद्रेचा अंमल चढायला सुरूवात झालीच होती. जाताना तीन-चार मेणबत्त्या घेतल्या कारण लाईट अजूनही आलेच नव्हते. घरी जाऊन सगळ्या मेणबत्त्यांच्या प्रकाशात पुन्हा एकदा सगळी खोली तपासली आणि मगच निद्रादेवीला शरण गेलो.