Tuesday, June 19, 2012

थरारक जंगल भ्रमंती (हुकलेला प्रचितगड)- भाग ४



कसलेही विघ्न न येता रात्र अगदी शांततेत पार पडली..मला दोन-तीन वेळेस पालापाचोळा वाजल्याचा भास झाला पण तिकडे दुर्लक्ष करून मी निवांतपणे निद्राधीन झालो. सकाळ उगवलीच ती मुळी एकदम प्रसन्न वातावरणात. तुम्ही कधी कुणी जंगलातली सकाळ अनुभवलीये..नसेल तर जरूर अनुभवा..देवाशपथ सांगतो त्यासारखे सुंदर काही नाही...
पक्षी किलबिलाट करत आपापल्या कामाला लागलेले असतात..कोवळी उन्हे गर्द झाडांमधून पाझरत पाझरत खालच्या सुकलेल्या पानांच्या गालीच्यावर सुवर्ण नक्षीकाम केल्यासारखी पसरली असतात..थोडीशी थंडी..थोडी बोचरी हवा गुदगुल्या करत आपली जाणीव करून देते आणि एकूणच वातावरणात इतकी प्रसन्नता भरली असते की बस..
जाऊ दे माझ्याच्याने फार वर्णन नाय करवत..मी तर इतका त्या वातावरणात गुरफटून गेलो होतो की फोटोबीटो पण काढायचे लक्षात आले नाही. तसाच एका झाडाच्या खोडाला टेकून नुसते जंगल अनुभवत राहीलो.
दरम्यान, अमेयने छानपैकी उप्पीट बनवायला घेतले होते. त्या फोडणीचा वास असा छानपैकी घेत असतानाच ज्याची सर्वात भिती होती तेच झाले..
समोरच्या झाडीतून दोन फॉरेस्ट गार्ड दत्त म्हणून उभे ठाकले. बर आले ते एकदम समोर येऊन बसलेच...
दोन मिनिटे काय बोलावे ते सुचेनाच. ते पण काही न बोलता निवांत.
मीच कोंडी फोडली...
"रामराम"
"राम राम, कुठुन आला?"
"मुंबई आणि पुणे..हे मुंबईचे आणि आम्ही दोघे पुण्याचे"
"परवाना आहे का..??"
"परवाना कसला परवाना.??"
"जंगलात मु्क्काम ठोकून राहीलाय, आग पेटवलीये आणि वर विचारता कसला परवाना,"
मामांनी एकदम फर्स्ट गियर टाकला.
"नाही त्याचे काय आहे आम्ही निघालो होतो प्रचितगडावर, पण वाटेत अंधार झाला..वाट सापडेना..म्हणून इथे मुक्काम केला. आमच्याकडे परवाना वगैरे काय नाही,"
"तुम्हाला माहीती नाही का हे टायगर रिझर्व आहे..कुठुन पाथरपुंजवरून आला ना..तिथल्या फारेस्टगार्डला विचारलेत का जाऊ का म्हणून?"
मामा फुल जोशात..बोलण्यात वर्दीची गुर्मी साफ डोकावत होती..
"नाय तिकडे कुणी नव्हते. तो कोण फॉरेस्ट गार्ड आहे बाळू तो ऑफीस सोडून खाली गावात निघून गेला होता. गावकरीपण आम्हाला काय बोलले नाहीत.."
आमचा बचावाचा क्षीण प्रयत्न..पण काय माहीती तोच उलटवार होईल म्हणून..तो दुसरा फारेस्ट गार्ड शांतपणे म्हणाला मीच बाळू..आणि कालच्याला मी गावातच होतो..
आयला...चेहर्यावर हसू उमटू न देण्याचा कसोशीने प्रयत्न करत मी म्हणालो
"अहो पण गावकरी म्हणाले तुम्ही नाहीये म्हणून ऑफीसात. नायतर काय तुम्हाला विचारले असतेच ना आम्ही,"
"चला उठा लवकर, सामान आवरा तुमचे"
कुठे चला..
"पाथरपुंजला. विनापरवाना जंगलात राहील्याबद्दल, आग पेटवून वणवा लावल्याबद्दल तुमच्यावर केस करायचीये..वीस हजार रुपये दंड तो नाही भरला तर सहा महिने जेल.."
शप्पथ, हे प्रकरण सिरीयस होते..अरेरे
तेवढ्यात मला शंका आली..
एक मिनिट, तो वणवा आम्ही नाही लावला. उलट आम्ही विझवायचा प्रयत्न केला. खरं वाटतं नसेल तर हे पहा आम्ही किती काळजी घेतलीये आग पसरू नये यासाठी..
असे म्हणत त्याला आम्ही कशी स्वच्छता केलेली, पाणी कसे शिंपडलेले वगैरे दाखवले..पण त्याची मग्रुरी काय कमी होईना..
"पण जंगलात राहीलात ना. उठा लवकर..तुमच्यावर केस होणारच."
त्या तशा दुर्धर प्रसंगी अमेयला कसे काय सुचले माहीती नाही..
तो अजुनही त्याच्या उप्पीटातच होता..आणि अगदी मन लावून त्याने उप्पीट बनवले होते.
"आम्ही कालपासून काय खाल्ले नाहीये..आत्ता थोडे खाऊन घेऊ का..असेही बनवून झाले आहे..खातो आणि मग निघुया.."
त्या गार्डने पाहिले आणि चक्क हं लवकर खावा आणि चला असे म्हणत बसला.
आम्ही सर्वांनी कहर शांतपणे आपापल्या प्लेट काढल्या आणि काहीच झालेच नाही अशा थाटात निवांतपणे उप्पीट खायला सुरूवात केली.
"आयला, अम्या, जमलंच आहे रे उप्पीट, खासच, लिंबू आहे का पिळायला यावर"
फुल्ल बडबड..ते गार्ड बघतच बसले..त्यावर कळस म्हणजे अमेय त्यांनाच विचारतोय..
"काका तुम्हीपण खाणार का थोडे उप्पीट..मस्त झालेय.."
हे त्यांच्या दृष्टीने अतिच होते.
"नको, पटदिशी आवरा, आम्हाला सेन्ससच्या कामासाठी जायचंय पुढे..मोठे साहेब येणार आहेत."
असे म्हणून ते लांब जाऊन बसले.
आता मात्र गंभीर होण्याची वेळ होती. सगळ्यांनी आपापले सोर्सेस काढायला सुरूवात केली. मी बायकोला फोन केला. ती पण पत्रकार आणि ती वनखात्याच्या स्टोरीज द्यायची हे माहीती होते..
हळुवार आवाजात तिला आमच्यावर ओढवलेल्या संकटाची कल्पना दिली.
तिने सर्वप्रथम बायकोचा हक्क बजावत ठणाणा केला. असे कसे काय कुणाला न विचारता गेलात जंगलात..वगैरे वगैरे (अधिक तपशील देण्यात अर्थ नाही..सर्व विवाहीत पुरुषांना याची अनुभुती असेलच).
मी तिला कसेबसे थोपवले..म्हणलो तु काय म्हणशील ते ऐकून घेतो पण आता मला तुरूंगात घालायला निघालेत..आत्ता मला इथून बाहेर काढ बयो
सुदैवाने तिने ऐकले..बर म्हणली बघते..
दरम्यान, स्वप्नील आणि प्रणवही कुणाकुणाला फोन लावून सेटींग लावायच्या मागे होते.
मी पण जरा काही होतंय का बघायला म्हणून माझे प्रेसकार्ड घेऊन त्या गार्डकडे गेलो. त्यांना म्हणले
"आम्ही पत्रकार आहोत, आम्हाला खरेच माहीती नव्हते. आम्हाला गडावर जायचे होते पण आम्ही रस्ता चुकलो."
ते कार्ड पाहून तो बराच नरम आला पण हेका सोडेना..
"अहो तुम्हाला तर फारेस्टचे नियम माहीती पाहिजे. तुम्हीच असा कायदा मोडायला लागले तर कसे व्हायचे. या भागात अस्वलं आहेत..आता मला सांगा तुमच्यावर रात्री अॅटॅक झाला असता तर कुणाच्या डोक्यावर आले असते हे..माझ्याच ना.."
भले मोठे लेक्चर..
मी आपला कान पाडून ऐकत बसलो..पण एवढे करून त्याचा आम्हाला पाथरपुंजला घेऊन जाण्याचा हट्ट कायमच..
"तुम्ही आता असे करा, तुमचे सगळे सामान ऑफीसमध्ये सोडा आणि नंतर येऊन थोडा दंड भरून घेऊन जा."
थोडा म्हणजे किती..
"थोडा म्हणजे चौघांचे मिळून आठ हजार तरी भरावेच लागतील बघा."
हॅट्ट साला..काय उपयोग नाही..आणि सामान तर सोडणे सर्वथया अशक्य होते..
दरम्यान बायकोचा फोन आला तिने पुण्यातल्या एका वनाधिकाऱ्याचां नंबर दिला..जरा हायसे वाटले...
मग तातडीने त्यांना फोन लावला..
त्यांनी आश्वासक सुरात सांगितले, काही काळजी करू नका..द्या त्या गार्डला फोन
मग अदबीने त्या गार्डला सांगितले..
असे असे साहेब बोलतायत..
त्याची मग्रुरी, ताठा एकदम संपला आणि उभा राहून बोलायला लागला..
"होय साहेब नाही साहेब...नक्कीच साहेब."
"अहो पण त्यांनी वणवा लावला मंग.."
मला जाणवले इथे हस्तक्षेप करण्याची गरज आहे..मी चक्क त्याच्या हातातून फोन खेचून घेतला आणि सांगितले की वणवा कसा लागला होता आणि आम्ही कसा विझवायचा प्रयत्न केला आणि हा माणूस तो आळ आमच्यावर घालतोय..
झाले आता तर त्याचे उरले सुरले अवसानपण गळाले..भिजलेल्या आवाजात त्याने एवढेच म्हणले मग साहेब त्यांना किमान प्रवेशशुल्क तरी भरावे लागेल..
परत मी मध्ये पडलो..
"किती आहे प्रवेशशुल्क.."
वीस रुपये प्रत्येकी...
"हाहाहाहाहाहा, चला लगेच भरून टाकतो.."
मग त्या साहेबांना मनापासून धन्यवाद दिले..शंभर रुपये काढून त्या गार्डच्या हातावर टेकवले..
अर्थात त्याने त्याचा पावशेर ऐकवलाच..
"तुमच्यासारखे लोक येतात इथे. आम्ही कर्तव्य करायचे म्हणले की अशा ओळखी दाखवून सुटून जाता..आम्ही काम तरी करायचे कसे.."
हे मात्र तो शंभर टक्के खरे आणि मनापासून बोलला होता. मलाही ते जाणवले...त्याला म्हणले
"बरोबर आहे तुमचे...पण आम्ही कसलेही नुकसान केलेले नाही..मला वाटते तुम्ही आम्हाला शिकार्याच्या किंवा बाकीच्या उपद्रवी लोकांच्या रांगेत बसवणे चुकीचे आहे. आम्हालाही तुमच्याइतकेच जंगलाबद्दल प्रेम आहे आणि आपले हे वैभव असेच रहावे अशी आमचीही इच्छा आहे. "
अर्थात एवढ्या सगळ्या प्रकरणानंतरही त्याने आम्हाला प्रचितगडला काय जाऊ दिलेच नाही.
"अहो, तिकडे मोठे साहेब आले आहेत सेन्ससच्या कामासाठी...त्यांना कळले आम्ही तुम्हाला असे सोडून दिले तर नोकरी घालवाल.."
"तुम्हाला आता कोकणात जायची वाट दाखवतो तिकडून चिपळूणला जा आणि तिकडून घरी.."
आता आम्हीही फार ताणून धरले नाही..पण एवढे लांब आल्यावर किल्यावर न जाताच परत जायचे म्हणजे अगदीच वाईट वाटत होते.
तिकडे स्वप्नील आणि अमेयला सगळी घडामोड ऐकवली. त्यांचाही घरी जायचे म्हणून हिरेमोड झाला. आणि आम्ही आवरा-आवरी करायला घेतली.
पण ती इतकी संथगतीने की त्या गार्डला असह्य झाले.
अहो आटपा, आम्हाला ड्युटी आहे..तुमच्यासारखे नाय
असे बडबड करून झाली..पण आम्ही ढिम्मच...
त्याचा पुरेसा अंत पाहून म्हणजे जवळजवळ एक तासाभराने आमचे पॅकींग करून झाले..
अशी आशा होती की तो कंटाळून निघून जाईल आणि गुपचुप आम्हाला किल्ल्यावर सटकता येईल. पण तो आमचे बारसे जेवला होता. त्याला शंका होतीच हे सरळ मुकाट्याने वागणारे लोक नाहीत. त्यामुळे तो चडफड करत बसून राहीला होता.
मग बरेच अंतर चालून त्याने एका वाटेने आम्हाला चक्क खाली घालवले आणि आम्ही गेलोय याची खात्री करूनच मग तो आपल्या वाटेला गेला.
आणि मग त्या अत्यंत कंटाळवाण्या आणि दमछाक करणाऱ्या वाटेने कडकडीत उन्हाचे आम्ही पावले ओढत चालत राहीलो. दमणूक होण्याला तर काहीच अंत नव्हता..पाय बुटात शिजून निघत होते..दर दहा मिनिटांनी घशाला कोरड पडत होती..उनाचा तडाखा असह्य होत होता..पण समाधान एकाच गोष्टीचे होते..
ठरल्याप्रमाणे जंगल ट्रेक पार पाडला होता...
आणि शेवटी सुखद आठवणीच लक्षात ठेवायच्या असतात ना..

समाप्त...

1 comment: