Tuesday, June 19, 2012

किल्ले रामसेज

गेल्या हिवाळ्यात मी पुण्यातल्या गिरीदर्शन बरोबर रामसेज-धोडप-कंचना असा नाशिक प्रांतातला ट्रेक केला. या ट्रेकमध्ये सांगण्यासारखे फारसे न घडल्यामुळे फक्त फोटो टाकत आहे
रामसेज हा किल्ला तसा लहान आकारातच मोडण्यासारखा...आणि गावातून तर त्याच्या आकाराची अजिबात कल्पना येत नाही.
जसे जसे किल्ल्याकडे जावे तसे त्याच्या आकाराचा अंदाज येत जातो.

या किल्ल्याला अभिमानास्पद असा इतिहास आहे...मोगलांच्या स्वारीदरम्यान, जेव्हा मोगल सैन्य किल्ल्यापाशी पोचलं तेव्हा किल्ल्याचा लहान आकार पाहून एका मोगल सरदाराने वल्गना केली की एका दिवसात शहनशहांना हा किल्ला जिंकून देतो. आणि त्यांनी पूर्ण शक्तीनिशी किल्ल्यावर चढाई केली...मराठे सैन्य सावध होतेच त्यांनी इतका तिखट प्रतिकार केला की खानाचे डोळेच पांढरे झाले...
एक दिवसाची मुदत हळुहळु एका आठवड्यावर नंतर एका महिन्यावर गेली तर हट्टी मराठे हार मानेनात..त्यांनी एकांगी किल्ला लढवत ठेवला...होता होता वर्ष झाले तर किल्ल्याची तब्येत खणखणीतच...
मोगल सैन्य टेकीला आले पण काहीही उपाय सापडेना...जितके हल्ले करावे तितकेच त्यांची शक्ती कमी होत चालली होत होती. सुरुंग लावता येत नव्हता, वेढा घालून उपयोग नाही...रोज दारूगोळा आणि माणसांचा मात्र नाश होत चालला होता.
अशी तब्बल दोन वर्षे गेली पण तरीही काहीही नाही. एक दिवस एक मौलवी सैन्यात दाखल झाला. त्याने सांगितले मी दैवी शक्ती जाणतो मला मुबलक पैसा आणि साधन सामग्री द्या...मी किल्ला जिंकून दाखवतो...
मग त्याने एका आठवड्याभरात एक सुबक असा सोन्याचा नाग बनवला. त्याला मंतरले आणि मग खानाला म्हणाला, आता आपल्याला भिती नाही. शत्रुची गोळी किंवा बाण आपल्याला स्पर्श करू शकणार नाही. तुम्ही माझ्यामागोमाग या..
आणि मग डोक्यावर तो नाग धरून मौलवी चालत किल्ल्याकडे निघाला..त्यापाठोपाठ एका रांगेत सगळे मोगल सैन्य...
किल्ल्यावरच्या मराठ्यांना हे अद्भुत दृश्य दिसल्यावर त्यांनीही नेहमीची गोळामारी थांबवली आणि गंमत बघत बसले...
नेहमीच्या पल्ल्यात गेल्यावरही वरून काहीच मारा होत नाही असे पाहिल्यावर मोगलांचा जोर वाढला...
अल्ला हो अकबर करत सगळे सैन्य गर्जना करू लागले पण तरीही कुणी त्या मौलवीला ओलांडून हल्ला करायला पुढे आले नाही. संरक्षक कवच तुटले तर...
असे करत करत मराठ्यांनी त्यांना बरेच पुढे येऊ दिले...विजयाच्या आनंदात मोगलही बेभानपणे पुढे आले...आणि वरून एक गोळी सणसणत आली आणि नागासकट मौलवी महाशय धाराशायी झाले...
झाले...उरल्या सुरल्या मोगल सैन्याचा धीर सुटला आणि त्यांची कत्तलच उडाली.
विश्वास बसणार नाही पण तब्बल साडेसात वर्षे तो किल्ला मोगलांशी झुंजत राहीला...
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

इंडियन व्हाईट बॅक व्हल्चर बहुदा
प्रचि १०

प्रचि ११

No comments:

Post a Comment