Thursday, June 28, 2012

दुर्गभ्रमंती करवीरनगरीची भाग - ३



दुसरे दिवशी सकाळीच स्वप्नील सर्वांच्या आधी उठून छोटेखानी भटकंती करून आला होता. आम्ही पण पटापट चिक्क्या खाऊन नाष्टा भागवला आणि किल्ला पहायला सुटलो.


भूदरगड हाही भोज राजाने बांधला असे म्हणतात. शिवाजी महाराजांनी जिंकल्यानंतर तो पुन्हा अदिलशाहीत गेला व नंतर पुन्हा महाराजांनी जिंकून घेतला. जिंजीवरून येताना राजाराम महाराज काही काळ या किल्ल्यावर वास्तव्यास होते. यापेक्षा किल्ल्याला जास्त इतिहास नाही. पण किल्ल्याचा विस्तार आहे मात्र भला थोरला. संपूर्ण फिरायला आख्खा दिवस जाईल असा. रात्री अंधारात आलो तेव्हा मुक्कामाची जागा पाहीली नव्हती. ती दिवसाउजेडी दिसली. एका वेगळ्याच बांधणीचे मंदीर..बाहेर दीपमाळ वगैरे..सुंदर प्रकार..


मंदिराच्या समोरच्या बुरूजावर ओतीव तोफ आहे. त्यावर आकृती कोरली आहे.


किल्ल्याची तटबंदी अजूनही खणखणीत आहे. जिन्याने वरती चढलो की आसमंताचे फार सुरेख दर्शन होते.






मग तळपत्या उन्हात छानपैकी चांदणसैर केली आणि तलावापाशी आलो. हा तलाव दुधी रंगाचा आहे आणि वार्‍यामुळे लाटा तयार होतात तो प्रकार फार भारी वाटतो.





हा किल्ला ऐवढा मोठा आहे की किल्ल्यावर चक्क मोठ्या प्रमाणावर शेती आहे. या तलावाचेच पाणी पंपाने खेचून सगळ्या पिकांना पुरवण्यात येते.


फिरून फिरून पाय तुटायच्या बेताला आले आणि उन्हाने डोके चांगले दुखायला लागले तेव्हा कुठे आम्ही पुन्हा मंदिराकडे परतलो. मग पटापट आवरून पुन्हा एकदा हॉटेल सचिन गाठले आणि भरपेट हादडून रांगण्याची वाट धरली.
रांगणा हा आमच्या भटकंतीमधला मुख्य आकर्षण होता. घनदाट वनराईने वेढलेला एकदम रांगडा किल्ला...
येक रांगणा खबरदार तो सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल असा उल्लेख खुद्द शिवछत्रपतींनी केला आहे. वाटेत मौनी महाराजांच्या मठाला भेट देण्याचे ठरवले होते पण तो काही योग आला नाही. वाटेत एक अनावस्था प्रसंग येऊ शकला असता. एकतर सकाळपासूनची झालेली दमणूक, त्यावर दुपारचे भरगच्च जेवण आणि बाईकवर येणारा थंडगार वारा याचा एकत्रित परिणाम होऊन प्रचंड पेंग यायला लागली होती. मी मोठ्या मुष्किलीने निद्रादेवीचे आवाहन परतावून लावत होतो पण एका बेसावध क्षणी डोळे मिटले गेले ते कळलेच नाही. अतिशय निग्रहाने डोळे उघडले तोवर माझ्या युनीने रस्ता सोडला होता आणि बाजूच्या गवतात घुसली होती. पटकन गाडी सावरली आणि पुन्हा रस्त्यावर आणली. वेग फारसा नव्हता आणि गाडी रस्त्याच्या बाहेर जाण्याऐवजी विरुद्ध दिशेच्या गाडीसमोर आली नाही हे मोठे सुदैव.
पुढे जाऊन गाडी थांबवली. तोपर्यंत मागेच असलेल्या स्वप्नीलला जाणवले काहीतरी गडबड झाली ते आणि तो ही थांबला. त्यावेळी गांभिर्य फारसे जाणवले नाही त्यामुळे जाम हसायला आले पण आत्ता लिहीताना जाणवतेय की काहीही घडू शकले असते. थंडगार पाण्याचे तीन-चार हबके मारून डोळ्यातील झोपेचा पूर्ण निपटारा केला आणि मगच पुढे निघालो आणि सरळ रांगण्याच्या दिशेने जात चिकेवाडी, पाटवाडी गाठली.
सुरूवातीला जरा बरा रस्ता सोडला तर नंतर एकदम खडबडीत रस्ता..त्या रस्त्यावर पार गाड्यांचा खुळखुळा वाजत होता. पण तेव्हा किंचितही कल्पना नव्हती की हा रस्ता हमरस्ता वाटेल अशा वाटेवरून पुढे जावे लागणार आहे.
चिकेवाडी ते रांगणा हा २५ किमी रस्ता केवळ अनुभवावाच असा आहे. मला फार वाईट वाटतयं की मी या रस्त्याचे फोटो नाही काढू शकलो आणि शब्दातही नीट वर्णन करता येईल का ते माहीती नाही.
रस्त्याचे साधारण वर्णन असे की बर्यापैकी अरूंद वाट, दोन्ही बाजूला झाडे-झुडपे अमाप वाढलेली, रस्त्यात मध्येच दगडी, मुरुम, त्यातच बाजूच्या झाडांच्या मुळ्या आलेल्या, अचानक वेडी वाकडी वळणे, मध्येच चढ, एकदम तीव्र उतार आणि भसकन गाडी चक्क ओढ्यात...


मी सर्वात पुढे होतो आणि मला शंभर टक्के खात्री होती की आम्ही रस्ता चुकलो आहोत. हा गाडीने जाण्याचा रस्ता असूच शकत नाही. राजगडला जाण्याच्या वाटेचा चढ कमी केला तर साधारण असेल अशी वाट गाड्यांसाठी असूच कशी शकेल. मी हा विचार करेपर्यंत झाडीतून थोड्या उघड्यावर आलो आणि धक्क्याने मला एकदम पडायलाच झाले.
समोर एक २०-सीटर व्हॅन उभी होती. आईच्चा...म्हणजे इथे यायला दुसरा रस्ता आहे की काय. गाड्या थांबवून त्या व्हॅनपाशी गेलो. त्या ड्रायव्हरला विचारलो बाबा रे कुठून आलास..
"हे काय तुम्ही आलात त्याच वाटेने...."
शप्पथ, त्यावेळे इतका प्रचंड धक्का मला कधीच बसला नव्हता. मी केवळ त्या ड्रायव्हरला साष्टांग नमस्कार घालायचाच बाकी ठेवला होता.म्हणलो अरे महाराजा आम्ही बाईक्स आणता आणता मेटाकुटीला आलो तु ही थोरली गाडी आणलीस तरी कशी.
"काय करणार राव एकदा गाडी घातल्यावर वळायला पन जागा नव्हती अन् रिव्हर्सबी जाईना..मग आणली ठोकत ठाकत..."
मनोमन त्याला सलाम ठोकून पुढे आलो तर आधीचा रस्ता बरा म्हणायची वेळ आली.


एका कोरड्या ओढ्यातून गाड्या पुढे काढल्या आणि पुढे चांगलाच मुरुमाचा उतार लागला. उतार इतका तीव्र होता की गाडीचे ब्रेक करकचून आवळले तरी गाडी सरकायची थांबेना..अरे देवा..मला जाणवले आता आपण पडणार...आणि झालेही तसेच..फक्त भुसभुशीत मातीत चाके रुतल्याने धापकन पडलो नाही.
गाडीवर दोन भल्यामोठ्या सॅक बांधल्याने एकदा बॅलन्स गेला की तो माझ्याच्याने सावरता येणेच शक्य नव्हते. त्यामुळे मुकाट्याने उठलो, अंगावरची धूळ झटकून टाकली आणि गाडी उचलण्यासाठी मागून येणार्‍यांची वाट पाहू लागलो.



मग सगळ्यांनी मिळून ते अवजड धूड उचलले आणि तसेच ठेचकाळत डेड एन्डपर्यंत आलो.
इथे रस्ताच बंद केला होता म्हणून नायतर डायरेक्ट किल्ल्यावर गाड्या चढवण्याचा माझा मानस होता. चला किमान ट्रेकच्या तिसर्या दिवशी आता थोडे तरी चालणे होईल म्हणत गाड्या पार्क करून गडाकडे निघालो. शिवगडाप्रमाणे इथेही थोडे खाली उतरूनच मग गडावर जावे लागते.
मुख्य प्रवेशद्वाराच्या आधी रणमंडळ ही किल्ल्याची अतिशय भेदक संरक्षणक्षम रचना आढळते.


याचा कन्सेप्ट असा की शत्रूला अडचणीच्या जागी रेटून त्याचा खातमा उडवायचा. सगळ्यात पहिले म्हणजे भव्य बुरुजासमोर मुद्दाम मोकळी जागा सोडली आहे जेणेकरून शत्रु अगदी उघड्यावर येतो आणि त्यावर तोफांचा मारा करणे सोपे जाते. शत्रुसैन्याने नेट धरून पुढे मुसंडी मारलीच तर मुख्य प्रवेशद्वाराकडे जाणारी अरुंदशी पायवाट बुरुजाच्या उजवीकडून जाते. एका बाजूला बुरुज आणि दुसर्या बाजूला खोल दरी अशा चिंचोळ्या मार्गावरून येणार्या शत्रुसैन्याची वरून दगड, जळते पलिते इ. फेकून सहज वाट लावता येणे शक्य आहे. एक लहानशी तुकडीही शत्रुच्या हजारोंच्या सैन्याला पुरेशी ठरेल इतकी ही व्यवस्था जबरदस्त आहे.


दरम्यान मला पित्ताचा भयंकर त्रास व्हायला सुरूवात झाली होती. त्यातून ती अवजड सॅक आणि भरीला वजनी टेन्टपण माझ्याच कडे. त्यामुळे अक्षरश कष्टाने एकेक पाऊल उचलत मी पुढे चालू लागलो.


मुख्य प्रवेशद्वार ओलांडून पुढे आल्यावर चक्क तलावाच्या आकाराचा पाणीसाठा.


पण तिथेही खरकटी पडलेली, प्लॅस्टीकच्या पिशव्या, बाटल्या, कोंबड्यांची पिसे, बियरच्या बाटल्या..इथे यथासांग पार्ट्या होत असणार याची खात्री पटवून देणार्या...
त्या घाणेरड्या प्रकाराकडे डोळेझाक करून मनसोक्त पाणी प्यायलो आणि मंदिराच्या दिशेने वाटचाल करू लागलो तोच प्रचंड ढवळून आले आणि अगदी पोटाचा तळ खरवडून .....
हुश्श्य...उलटी झाल्यानंतर सगळे पित्त पडून गेले आणि एकदमच हलके हलके वाटायले लागले. दणादण उड्या टाकत मी बाकीच्यांना गाठले. आणि हलका झाल्यामुळे एकदम उंचावरच जाऊन उभारलो.


दरम्यान सूर्यमहाराज मावळतीकडे झुकले होतेच मग एक सुरेखशी जागा पाहून तो रम्य देखावा अनुभवला.


चांगला अंधार पडल्यावर थंडीही जाणवायला लागली होती आणि मला कडकडून भूक. त्यामुळे उठलो आणि अंधारात चाचपडत मंदीर गाठले. त्या तळ्यापासून मंदीर बरेच अंतरावर होते त्यामुळे स्वयंपाकासाठी फेर्या माराव्या लागणार हे कळून चुकले.
रांगणाई देवीचे मंदिर तर होते ब्येष्टच..त्या अंधाऱ्या, निर्जन, एकाकी किल्ल्यावर, सगळ्या बाजूने गर्द झाडीने वेढलेल्या मंदिरात राहण्याची खुमारी काही औरच होती. जंगलात राहण्याचा कितीही अनुभव आमच्या पाठीशी असला तरी प्रत्येक ठिकाणची मज्जा काही वेगळीच असते. कोयनानगरला अस्वले, बिबट्या आणि वन्यप्राणी असलेल्या जंगलात निवांत राहताना काहीही भिती जाणवली नव्हती पण इथे उगाचच एक अनामक भितीची लहर येऊन गेली. त्यात अमेयने मला आणि रोहनला पाणी आणायची आर्डर सोडली. एवढ्या लांब पाण्यावर जायला मी खरेतर नाखूश होतो पण पर्याय नव्हता. तेव्हा मी कुणाला सांगीतले नाही पण आत्ता कबूल करायला हरकत नाही..माझी बेक्कार .... होती तिथे पाणी आणायला जाताना. बरं नक्की कशाची भिती हे कळत पण नव्हते.
शेवटी भितीवर विजय मिळवला आणि सगळ्या बाटल्या भरून आणल्या. परत फेरी नको म्हणून तिथे पडलेल्या दोन-तीन बाटल्यापण भरून आणल्या. मग रुचकर खिचडी आणि शाही झोप...

No comments:

Post a Comment