Tuesday, June 19, 2012

थरारक जंगल भ्रमंती (कोयनानगर)-१

गेल्या आठवड्यात चांदोली अभयारण्यात नऊ पर्यटक चुकल्याची बातमी वाचली आणि मला आमचा मागच्या वर्षाचा उन्हाळी ट्रेक आठवला.
साधारणपणे उन्हाळ्याचे दिवस म्हणजे भटकी जमात घरी सापडण्याची शक्यता. पण आमची डोकी सदा फिरलेलीच त्यामुळे उन्हाळ्यात घरी बसण्यापेक्षा कुठेतरी जायला पाहिजे म्हणून चांदोली अभयारण्याचा प्लॅन निघाला...जंगली जयगड, भैरवगड आणि प्रचितगड हे दुर्गत्रिकुट घनदाट अरण्याने वेढलेले आहे. अस्वल, गवे आणि इतरही प्राणीसंपदा इथे मुबलक आहे. त्यामुळे उन्हाळ्यात जर आपण इथला ट्रेक केला तर प्राणीपण पाहता येतील आणि उन्हाळाही सत्कारणी लागेल असा विचार करत प्लॅन ठरवलाही.
नेहमीप्रमाणे मुंबईवरून स्वप्नील आणि अमेय येणार होते आणि मी आणि पुण्याचा एक प्रणव महाजन म्हणून एकजण त्यांना रात्री पुणे स्टेशनवर गाठणार होतो. रात्री उशीराची गाडी असल्यामुळे मी सॅक चक्क ऑफीसमध्येच आणून ठेवली आणि एक दिवसाची सुट्टी वाचवली. पण निघता निघता जाम उशीर झाला आणि गाडी सुटायची वेळी झाली तेव्हाही मी तिकीटाच्या लायनीतच उभा होतो. शेवटी अगदी कळवळून
"पाहुणा आजारी आहे हो, या गाडीला जायलाच पायजं," असं म्हणत रांग मोडून पुढे घुसलो आणि कसेबसे तिकीट मिळवून धाव ठोकली.
पाठीवर अवजड सॅक घेऊन स्टेशनचे जिने चढणे आणि तिथल्या गुळगुळीत फरश्यांवर धावणे किती जिकीरीचे आहे याचा अनुभव घेतच जनरलचा डब्बा गाठला. अपेक्षेप्रमाणेच तो तुडुंब भरला होता पण अमेय आणि स्वप्नीलने एक जागा पकडून ठेवली होती. घामेजलेल्या अंगाने बसकण मारली आणि म्हणालो
वाह ट्रेकची सुरूवात तर भारीच झाली.
पहाटेच्या सुमारास कधीतरी कराडला पोचलो. तिथे स्टेशनच्या बाहेर मस्त गरमागरम पोहे, उपीट असा भरपेट नाष्टा करून कोयनानगरमार्गे नवजाच्या दिशेने सुटलो. रात्री झोप अशी झालीच नसल्याने गाडीत पुरी करण्याचा बेत त्या एसटी ड्रायव्हरने पुरता मोडून काढला. ज्या सुसाट वेगाने खडबडीत रस्त्यावरून तो भरधाव निघाला होता ते पाहून नवजाला जाईपर्यंत हाड-न-हाड खिळखिळे होणार याची खात्रीच पटली.
जंगली जयगडला जाण्यासाठी नवजा गावात जाण्यापेक्षा त्याआधी लागणार्‍या कोयनानगर वीज विद्युत प्रकल्पापाशी उतरणे जास्त सोयीचे पडते. अवघडलेल्या अंगाने आणि रात्रीच्या जागरणाने लाल झालेले डोळे घेऊन जेव्हा आळोखेपिळोखे देत त्या प्रकल्पाच्या वसाहतीपाशी उतरलो तेव्हा जंगली जयगडचे घनदाट जंगल आमचे स्वागत करायला समोरच ठाकले होते.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने उन चढायच्या आतच किल्ला उरकावा असा प्रयत्न होता. त्यामुळे तिथल्या लोकांना जरा विनंती करून त्यांच्या क्वार्टर्समध्ये आमच्या अवजड सॅक ठेवल्या आणि पाण्याच्या बाटल्या आणि कॅमेरे घेऊन जयगडच्या दिशेने निघालो.
सकाळची वेळ असल्याने एक सुखद गारवा होता, वातावरणात सगळीकडे जंगलाचा वास पसरला होता. मी मोठा श्वास घेऊन तो वास छातीत भरून घेतला...एकदम उत्साहवर्धक....

डांबरी रस्ता सोडून मळलेल्या पायवाटेला लागलो तेव्हा खरा चढ सुरू झाला. हाश-हुश करत धापा टाकत बरेच अंतर पार केले...पण आधी मळलेली वाट आता भलतीच अरुंद झाली होती आणि कुठेही वेडीवाकडी भटकत चालली होती. तिची लक्षणे काय धड दिसेनात तेव्हा आम्ही थांबून जरा आढावा घेतला आणि विचारांती असे लक्षात आले की किल्ल्याकडे जाणारी ही वाट नाही. कारण सांगातीच्या खुणांनुसार पार किल्ल्यापर्यंत मळलेली प्रशस्त वाट जाते.
जंगली जयगड हा घनदाट जंगलाने वेढलेला असून जंगली श्वापदांचा इथे बर्‍यापैकी राबता असल्याने असे वाकडे-तिकडे भटकणे धोक्याचे होते. सुदैवाने, आम्हाला लांबवर लाकूडतोड्याची खटखट ऐकू आली. त्या आवाजाच्या अनुरोधाने गेल्यावर एकांडा लाकूडतोड्या दिसला. त्याच्याकडे पाहताच तो वीरप्पनचा मोठा फॅन असल्याचे कळून येत होते.
राम राम झाल्यावर आम्ही त्याला सांगितले वाट चुकल्याचे. तर लगेच तयार झाला...
"चला की दावतो तुमाला.."
आणि आमच्या चेहर्‍यावरच्या उत्साहाला टाचणी लावत पुढचे वाक्य आलेच...
"दोनशे रुपाय पडतील, वाट दावायचे..."
आयला, हे काय नवीन...
आत्तापर्यंतचा आमचा अनुभव प्रसंगी हातातलं काम सोडून गावकरी मदत करायला येतात. पण हे साहेब भलतेच होते...वीरप्पनचा प्रभाव म्हणायाचा का हा...
छे, याला दोनशे रुपये देण्यापेक्षा आपण आपली वाट शोधू, थोडा वेळ लागेल पण सापडेल...असा विचार (नंतर जाणवले तो अविचार होता) करत पुढे गेलो. जशी वाट सापडेल तसे जात धस्सकन एका कड्यापाशी आलो. तिथून जंगली जयगड दिसतच होता समोर. पण जाण्याची वाट कुठूनही कळत नव्हती.

जंगली जयगडचे प्रथम दर्शन



तिथे आम्हाला ही हाडकेही सापडली...कशाची ते काय कळले नाही
खूप वेळ शोधाशोध करूनही काही वाट सापडेना तेव्हा नाक मुठीत धरून विरप्पनला शरण जाण्याव्यतिरिक्त काय उपाय उरला नाही. तोपर्यंत त्याचा जावयासारखा मान वाढला होता आणि दोनशेच्या खाली उतरायलाच तयार होईना. शेवटी ५० रुपयांवर तो लांबून वाट दाखवायला तयार झाला.
कहर म्हणजे आम्ही ज्या कड्यापाशी जाऊन अडकलो होतो तिथेच आम्हाला घेऊन आला आणि एक अशक्य वाटणारी वाट त्याने आम्हाला दाखवली. आमचे कुणाचेच त्या वाटेने जायचे धाडस होईना तेव्हा तोच त्या वाटेने चालू लागला आणि उतारावरून अत्यंत धोकादायक पद्धतीने जाणारी जेमतेम पाऊल टिकेल एवढी वाट पार करून दाखवली.


हीच ती वाट..अगदी अंधुक अंधुक दिसतीये
तिथून थोड्याच अंतरावर आम्हाला किल्ल्याकडे जाणारी मळवाट दिसली. मग विरप्पनच्या हातावर पन्नास रुपये टिकवून आणि त्याचा फोटो काढून पुढे चालू लागलो.


वाट सुरेखच होती आणि नंतर खाली उतरल्यावर आमच्या लक्षात आले की आम्ही सुरूवातीपासूनच चुकलो होतो. कुठल्यातरी भलत्याच वाटेने निघालो होतो आणि मग विरप्पनला पैसे द्यावे लागल्याचे दुख जरा कमी झाले.
जयगडला जाण्यासाठी नेहमीपेक्षा उलटे म्हणजे खाली उतरावे लागते. जोपर्यंत जंगल होते तोपर्यंत काही वाटले नाही पण किल्ला अगदीच उघडाबोडका...जेमतेम खुरटलेली झुडपे...बाकी काहीच नाही...

त्यामुळे उन्हाचा तडाखा एकदम जाणवायला लागला. वरून सूर्य पेटला होता तर खाली मातीपण चांगलीच तापून निघाली. आधीच एकतर चुकल्यामुळे बराच वेळ वाया गेला होता त्यामुळे उन्हाचा त्रास व्हायच्या आत किल्ला पाहू हा अंदाज सपशेल चुकला होता आणि भर उन्हाळ्याच्या दुपारी रणरणत्या उन्हाचा सामना करत उघडाबोडका डोंगर तुडवायची शिक्षा काय असते हे चांगलेच कळून चुकले. एकतर पटकन जाऊन येऊ म्हणून पाणी पुरेसे घेतलेले नव्हते त्यामुळे एकएक विकेट पडायला सुरूवात झाली (पहिली माझीच पडली).

किल्ल्याची तुटकी तटबंदी पार केली आणि लक्षात आले की किल्ला म्हणण्यासारखे काहीच उरलेले नाही. ना बुरूज ना कसले अवशेष..नुसता डोंगर..

त्यामुळे आणखी पुढे जाण्याचा माझा उत्साह मावळला आणि तिथल्याच एका खुरटलेल्या झुडपाच्या सावलीत शक्य होईल तितके मावलो आणि बाकींच्या पुढे जाण्याचा इशारा केला. थोडे पुढे जाताच प्रणवने माझे अनुकरण केले. पण स्वप्नील आणि अमेय यांना दांडगी हौस...ते गेले तसेच फरफट करत...

उन्हाने जेव्हा आणखीनच लाही लाही व्हायला लागली तसे ते बिचारे झुडुपपण कोमेजून गेले. अगदीच असह्य झाले तेव्हा मग उठलो आणि इथे बसण्यापेक्षा जंगलात निवांत सावलीत बसू म्हणून उलट पावली मागे चालू लागलो, प्रणव होताच बरोबर.

किल्ल्यावरून दिसणारा रस्ता
तो वैतागवाणा चढ चढून पुन्हा एकदा जंगलाच्या वेशीवर आलो. थोडे आत जाऊन एक मस्त ओंडका शोधून काढला आणि त्याला टेकून छान तणावून दिली.
दहा-पंधरा मिनिटे झाली नसतील तोच वाळलेल्या पाचोळ्यावरून कुणीतरी येत असल्याचा आवाज झाला. आधी वाटले हेच दोघे असतील पण एकदम जाणवले की आवाज जंगलाच्या दिशेने येतोय. पडल्यापडल्याच ओंडक्याच्या वर डोकावून पाहिले आणि थक्क झालो..
आमच्यासमोर जेमतेम १० फुटांवर एक छानपैकी भेकर (बार्कींग डीअर) चालत येत होते. आयला...त्याला आम्ही ओंडक्यापलीकडे असल्याचा अजिबात पत्ता नव्हता आणि ते सावधपणे इकडेतिकडे बघत त्याच दिशेला येत होते. आणि मला माझ्या मूर्खपणाबद्दल संताप संताप झाला. उन्हाने वैतागल्यामुळे मी कॅमेरा बंद करून ठेऊन दिला होता. आता तो काढायचा म्हणजे हालचाल, चेनचा आवाज तोपर्यंत भेकर काय बघत बसणार का...छे जाम चरफडलो...
तोपर्यंत प्रणवचेही लक्ष भेकराकडे गेले होते. त्याचा कॅमेरा बाहेरच होता. मला त्यातल्या त्यात बरे वाटले, किमान कुणाला तरी फोटो मिळाल्याशी कारण. पण दुर्दैव असे की लेन्सची कॅप काढण्याचा अत्यंत सूक्ष्म क्लक असा आवाजपण त्या अतिसावध मृगासाठी पुरेसा होता. त्याने अर्धा सेकंद ओंडक्याच्या दिशेने रोखून पाहिले आणि भॉंक असा चक्क भुंकल्यासारखा आवाज करून ते उलट दिशेला पसार झाले.
नंतर बराच वेळ मी कॅमेरा सज्ज करून ते पुन्हा यायची वाट बघत बसलो, पण छे...
संधी निसटली होती आणि आता पुन्हा मिळण्याची शक्यता जवळपास शून्य होती...

हाच तो ओंडका आणि हाच तो निराश मी (फोटो - प्रणव महाजन)
दरम्यान, हे दोघे आले..त्यांनाही जाम चुटपूट लागली. आम्हाला फोटो मिळाला नसला तरी याची देही अस्सल जंगली हरण एवढ्या जवळून पहायला मिळाले हेही नसे थोडके...त्यांना तेही मिळाले नाही.

त्या जंगलवाटेने पुढे जायला लागलो तेव्हा जाणवले की प्रचंड तहानेनी घसा कोरडा पडला आहे. बरोबर आणलेले पाणी केव्हाच संपले होते आणि नवजा गाठायला किमान तास-दीड तास चाल होती. तसेच पाय ओढत चालत राहिलो आणि बर्य्चा वेळानंतर एक पिटूकले डबके दिसले. एरवी ते पाणी पिण्याचा विचारही केला नसता पण आता म्हणजे अत्यांनद झाला. किमान घसा ओला करण्यापुरते तरी पाणी हवे होते. हावरटासारखे जितके शक्य होते तितके पाणी पिउन घेतले.

जरा हायसे वाटल्यावर तिथेच जरा विसावलो तोच अमेयचे लक्ष तिथल्या ओंडक्याकडे गेले.
बिबटया किंवा अस्वल महाशयांची ती जाण्यायेण्याची वाट असावी कारण त्या ओंडक्यांवर त्यांनी मस्तपैकी नखे साफ केलेली जाणवत होती.


खल्लास...भारीच दिवस होता आजचा...
त्यांच्या राज्यात असल्याची जाणीव एकदम गडद झाली. भितीवगैरे काय वाटली नाही पण अस्वल किंवा बिबट्या जवळपास घुटमळत असण्याची शक्यता फारशी सुखावह नव्हती. त्यामुळे फार न रेंगाळता आल्या मार्गाला लागलो. सुदैवाने किंवा दुर्दैवाने वाटेत कुणीच भेटले नाही.
पुन्हा एकदा डांबरी रस्त्याला लागल्यानंतर कुठे चुकलो होतो हे ध्यानी आले आणि तो कंटाळवाणा रस्ता पार करून त्या वसाहतीत दाखल झालो.

मग तिथून कोयनानगर आणि पोटोबा करून हेळवाक गाठले. दरम्यान गावात मिळालेल्या माहीतीनुसार तिथून पुढे असणाऱ्या धनगरवाड्यात आम्हाला वाटाड्या मिळू शकणार होता. पण ते लोक पहाटे जात असल्याने लवकर उठणे भाग होते. त्यामुळे रात्रीचा साग्रसंगीत स्वयंपाक थोडक्यात उरकला आणि तिथल्याच एका शाळेच्या आवारात तंबू टाकून निद्राधीन झालो.

चंद्रोदयाचा फोटो घेण्याचा निष्फळ प्रयत्न.. स्मित

No comments:

Post a Comment