Thursday, June 28, 2012

दुर्गभ्रमंती करवीरनगरीची भाग - ५



दुसरे दिवशीची सकाळ उगवली ती एक बारीकशी अडचण घेऊनच. सर्वसाधारणपणे किल्ल्यांवर पाण्याची फारशी अडचण नसते (उन्हाळी ट्रेक वगळता) आणि मुक्कामही शक्यतो पाणवठ्या आसपास असतो. पण एक तर रात्री किल्ला सर केल्यामुळे पाणी कुठे आहे का नाही हेच माहीती नव्हते. त्यामुळे प्यायला तर नाहीच नाही आणि सकाळच्या काही कार्यक्रमांसाठीही नाही अशी परिस्थिती ओढवली.
अर्थातच, ट्रेकर मंडळींना असल्या चिंता फार भेडसावत नाहीत. त्यामुळे त्यावर मात करून आम्ही किल्ला भटकायला निघालो.
सगळ्यात महत्वाचे सांगायचे झाले तर किल्ल्याने प्रचंड, अतिप्रचंड निराशा केली.
कित्येक वेळा आपण पुरातत्व खात्याच्या आठमुठेपणाबद्दल ऐकले आहे. पण ते तसे राहीले नाही तर काय होते याचे सामानगड हे एक ज्वलंत उदाहरण आहे. किल्ल्याचा जिर्णोद्धार करण्याच्या नावाखाली त्याचे मूळचे गडपण हरवून टाकून एका पिकनिक स्पॉटचे स्वरुप देण्यात आले आहे. मुळच्या जांभ्या खडकाच्या भक्कम बुरुजांवर साध्या विटांचे बांधकाम आणि त्यावर गेरू फासून इतके भयावह स्वरूप दिले आहे की पावलोपावली संताप होत होता.





गडावर छानशी झाडी राखली आहे पण तीही इथली स्थानिक नाही तर सामाजिक वनीकरणातून लावलेली निलगिरी जी इथल्या जैवविविधतेला अत्यंत घातक.


हा सगळा उद्योग ज्याने कुणी केला त्याला धरुन चांगले बडवून काढावेसे वाटत होते.
मग तशाच उदासवाण्या मनाने गडफेरी उरकली...
गडावर एक प्राचीन विहीर आहे..सुदैवाने अजूनही ती शाबूत आहे त्यामुळे तिथे काही फोटोसेशन केले..



गडाच्या बाहेर मस्त मारूती मंदीर आहे. सुदैवाने शनिवार असल्याचे लक्षात होते त्यामुळे त्या भिमरूपाचे स्तोत्र म्हणून त्याचे आशिर्वाद घेतले आणि पुन्हा गढींग्लज गाठले. आता उत्सुकता होती ती आमचे ऐतिहासिक घर (हो महत्वाचा नसला तरी फडणीस घराण्याचा म्हणून काहीतरी इतिहास असेलच ना स्मित)
पुन्हा त्या काकांना फोन केला आणि ते अगदी तत्परतेने येऊन आम्हाला माझ्या घरी घेऊन गेले.
घर लहानसेच, कौलारू आणि बाबांच्या काळाशी साम्य दाखवणारे होते. बाकीचे गाव वाढले पण हे घर मात्र तिथेच थबकून राहील्यासारखे वाटत होते.
थोडेसे वाकून त्या ठेंगण्या दारातून आत प्रवेश केला आणि अगदी अंगावर रोमांच उठले. काहींना यात अती केल्यासारखे वाटेल...साध्या घरासारखे घर त्यात काय ऐवढे..पण माझ्यासाठी ते नुसते घर नव्हेत. तिथे होते माझ्या आज्जी आजोबांचे आशिर्वाद, माझ्या बाबांनी, काकांनी, आत्यांनी घालवलेल्या बालपणच्या स्मृती, त्यांचे राग, लोभ, प्रेम, जिव्हाळा सगळे काही होते आणि ते मी अगदी अनुभवत होतो त्या क्षणी.
आम्ही ज्यांना घर विकले त्यांनी एकदम ऐसपैस स्वागत केले. खरतर मी अगदीच आगंतुकासारखा त्यांच्या घरी टपकलो होतो आणि माझा अर्थाअर्थी त्या घराशी संबधही नव्हता पण ज्या प्रकारे माझे स्वागत झाले त्याने अक्षरश माझ्या डोळ्यात पाणीच तराळले.
त्या कुटुंबाने घराचे नाव तसेच ठेवले होते इतकेच काय आजही विजेचे किंवा इतर बिले फडणीसांच्याच नावावर येतात.
"तात्यांनी (माझे आजोबा) आमचे खूप काही केले. आम्हाला ही वास्तू खूपच लाभली. त्यामुळे आम्ही नाव बदललेच नाही,"
ते काका सांगत होते.
"आज आता खूप दिवसांनी घराचे मूळ मालक आलेत घरी त्यामुळे अगदी छान वाटतय. आधी कळवलं असतत तर काहीतरी आणून तरी ठेवलं असतं"
अरे बापरे, मी मालक...मी आवंढा गिळला.. स्मित
तोच आतून आज्जींचे बोलावणे आले..एकापाठोपाठ एक असलेल्या खोल्या पार करत मी स्वयंपाकघरापर्यंत जाऊन ठेपलो...
"अरे तु अरूणचा मुलगा का...??"
मी आपला हो हो म्हणत नमस्कार करत तिथेच फडताळाला टेकून बसलो. आणि मग आजींच्या आठवणींना जो काही उत आला की बास.
हा काय करतो, तो कुठे असतो..आणि मग आमच्याच अनेक नातेवाईकांच्या आठवणी..ज्यातली निम्मी नावे मी कधीतरी अंधुक ऐकल्यासारखी वाटत होती.
"तुला अण्णाचा थोरला वसंता माहीती असेल ना..तो लंडनला गेलाय म्हणे..."
मला इथे अण्णा कोण हेच लक्षात येईना त्यात त्यांचा थोरला आता कुठे असतो हे तर फारच झाले.
आज्जीं ९० पुढच्या असाव्यात पण अजूनही आवाज खणखणीत आणि स्मरणशक्ती प्रचंड दांडगी..मी मनोमन त्यांना दंडवत ठोकले आणि घर न्याहाळण्याच्या बहाण्याने तिथून सुटका करून घेतली.
तोपर्यंत त्यांनी दोन्ही सुनांना कामाला लावत चहा-पोहे करायला लावलेच.
"येत जा बाबा अधुन मधुन..आपलंच घर आहे..बायका-पोराला पण घेऊन ये दाखवायला..."
काय वाटत होते त्यावेळी सांगता येत नाही पण कसाबसा डोळ्यातले पाणी परतावून लावत होतो एवढे मात्र आठवते.
आता पुढचे उद्दीष्ट होते नेसरी...
स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या अपूर्व बलिदानाने पवित्र झालेले स्थान...
गावात प्रवेश केल्या केल्याच प्रतापरावांचा भव्य अश्वारूढ पुतळा समोर येतो.



पुतळ्याच्या उजव्या बाजूने स्मारकाकडे जाण्याचा रस्ता आहे...
सुदैवाने, अन्य इतिहासीक पुरुषांच्या तुलनेत प्रतापरावांचे स्मारक खूपच चांगल्या परिस्थितीत आहे. छानसे बांधकाम, राखलेली बाग, सात ढाली आणि सात तलवारी आणि या पराक्रमाचे यथार्थ वर्णन करणारी माहीती असे सगळे काही...





पण मला सगळ्यात जास्त काही आवडले असेल तर आवारात असलेली महाराजांची रेखीव मुर्ती.. महाराजांच्या चेहर्यावर इतके करारी भाव आहेत ना की आपण त्या नजरेला नजर मिळवूच शकत नाही..आपोआप डोळे खाली झुकतात...



नेमके आम्ही गेलो तेव्हा स्मारक बंद व्हायची वेळ आली होती आणि महाराजांच्या समोर लोखंडी गेट. त्या गेटमधून कॅमेरा घुसवून जितका शक्य होता तितका चांगला फोटो घेण्याचा प्रयत्न केला.
महारांजाना, प्रतापरावांना आणि त्या सहा अनामिक वीरांना मुजरा घातला आणि गंधर्वगडाच्या दिशेने निघालो...
सूर्यास्त होऊ घातला होता आणि गडावरून छानसे प्रचि मिळण्यासाठी धडपड होती. पण जातानाच एक मस्त फ्रेम मिळाली ही अश्शी...


(फोटोवर कसलेही संस्करण केलेले नाही..पिकासा वापरून फ्रेम आणि वॉमा टाकलाय फक्त)
अर्थात त्यात वेळ गेल्यामुळे गडावर पोचायला थोडा उशीरच झाला आणि सूर्यमहाराजांना गाठण्यासाठी जाम धावपळ उडाली..
अमेय, रोहन तुडतुडीत असल्याने ढेकळे, मातीवरून टणाटण उड्या मारत माचीपर्यंत पोचले देखील. मला मात्र त्यांच्या गतीने धावणे होईना. त्यामुळे मी काहीश्या वैतागाने तिथूनच जमेल तसा फोटो काढण्यासाठी कॅमेरा हातात घेतला आणि अहो आश्चर्यम...

दैव माझ्यावर तुडुंब प्रसन्न होते बहुदा आज..सकाळी भुंग्या, मग हायवेवर तो गाडीचा शॉट आणि इथेही सहजगत्या एक भारी फ्रेम मिळाली..



नुसत्या सूर्याचे फोटो काढण्याऐवजी त्यात ह्युमन एलीमेंट वाढल्यामुळे फोटोला भारीच गंमत आली. माझ्या सर्वात आवडत्या फोटोंपैकी एक.
(करी आपलीच स्तुती तो एक मूर्ख असे समर्थ सांगून गेलेत....स्मित)


बाकी गडावर तसे पाहण्यासारखे काही नाही.



त्यामुळे थोडेफार फोटो सेशन उरकून आम्ही पारगडचा रस्ता धरला. वाटेत एके ठिकाणी जेवण करून पारगडला पोचायला चांगलीच रात्र झाली. गाड्या पायथ्याशी पार्क करत आम्ही पायर्यांनी गड चढू लागलो तेव्हातर कडाक्याची थंडी जाणवायला लागली होती.
गंमत म्हणजे थोडे पुढे जाताच विश्वप्रार्थना ऐकायला यायला लागली..
हे ईश्वरा सगळ्यांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे
सर्वांना सुखात आणि ऐश्वर्यात ठेव
सर्वांचं भलं करं, सर्वांचं रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे

ही खरं तर फार सुंदर प्रार्थना आहे पण ती ऐकली रे ऐकली की माझ्या डोळ्यासमोर जोशी वडेवालेच उभे राहतात. आयला गडावर पण शाखा उघडली का काय म्हणून कुतुहलाने पुढे सरकलो तर ध्यानमंदिर आणि त्यात ही कॅसेट अखंड वाजत ठेवलेली.
(नोट - इथे वामनराव पै यांचा कसलाही अवमान करण्याचा हेतू नाही..तसे कुणाला वाटल्यास आधीच क्षमा मागत आहे)
तसेच पुढे गेलो तर चक्क शाळा..गडावर मोठी वस्ती असल्याचे माहीती होते पण शाळा म्हणजे जरा गंमतच..शाळेच्याच पटांगणात बसवलेल्या फरशीवर तंबू टाकण्याचे ठरवले आणि परवानगी विचारायला जवळच असलेल्या खोलीपाशी गेलो.
तोवर दोन माणसे काय पाहिजे ते विचारत बाहेर आलीच. बोलता बोलता मी आत डोकावलो आणि थक्कच झालो. आता समिष भोजनाची तयारी होती पण चिकन, मटन नव्हते तर चक्क ससा किंवा त्यासदृश प्राणी होता. बाजूलाच त्याची कातडी वगैरे पडलेली होती. मी आत डोकावून पाहतोय हे त्या माणसांच्या लक्षात येताच त्यांनी पटकन दार लावून घेतले आणि आम्हाला काय पाणी वगैरे लागेल ते टाकीतून घ्या असे सांगून कटवले.
आम्ही अधिक तपशीलात जाऊनही काही उपयोग नव्हता त्यामुळे दिसल्या प्रकाराकडे चक्क डोळेझाक केली. (आता आम्ही केले ते चूक का बरोबर ते माहीती नाही) आणि उद्याच्या प्रवासाचे बेत आखत निद्राधीन झालो.

No comments:

Post a Comment