
चोरवणे गावात छान आदरातिथ्य अनुभवल्यानंतर दुसरे दिवशी सकाळी आम्ही छान ताजे-तवाने झालो होतो माझा गुढगाही दुखायचा कमी झाला होता. एकदंरीत ट्रेक छान झाला होता। पण अजुनही म्हणतात ना तसे खाज कमी झाली नव्हती.
चोरवणे गावातून पुण्याला जाण्यासाठी आधी चिपळूण गाठावे लागते। गावातल्याच एका घरी पोहे आणि चहा हाणून एसस्टीत बसलो तेव्हाही असे वाटत होते की एवढ्या लवकर पुण्याला जायचे का।माध्यानीला आम्ही चिपळूण एसस्टी स्थानकावर उतरलो. तिथल्याच एका त्यातल्या त्यात बऱया वाटणार्या हॉटेलात क्षुधाशांती केली आणि पुण्याला जाण्यार्या एसटीची वाट पहात बसलो. त्यावेळी आम्हाला गणपतीपुळे असा बोर्ड दिसला.आम्ही सहेतूक नजरेने एकमेकांकडे पाहताना अन्याने पाहिले आणि त्याने तातडीने ब्रेक लावला
"खबरदार, काहीतरी नवा प्लॅन केलात तर। आता मुकाट्याने पुण्याला जायचे."
आता माझाही पेशन्स संपला होता। पण तरीही त्याला समजावले
"अरे तिथे आपल्याला कुठे काय चढायचे नाहीये। इतक्या लांब आलोच आहोत तर गणपतीचे दर्शन घेऊ, समुद्रकिनारा पाहू आणि येऊ परत."
ही मात्रा लागू पडली, कारण गणपती हे त्याचे आराध्यदैवत। मग थोडेसे आढेवेढे घेऊन साहेब तयार झाले.संध्याकाळच्या सुमारास गणपतीपुळेला पोहोचलो. इकडे-तिकडे फिरलो, बराच वेळ किनार्यावर डुंबण्यात घालवला. सूर्यास्ताचे मनोहारी फोटो काढले. एकंदरीत मस्त एन्जॉय केले.आता परतीचे वेध लागले. तेवढ्यात चिपळूणची एसटी दिसली. वाहवा म्हणत जाऊन बसलो. योगेश आमचा कॅशियर, सगळे पैसे त्याच्याकडे सांभाळायला दिले होते. कंडक्टर तिकीट काढायला आल्यावर साहेबांनी खिशात हात घातला आणि शंभरची एकच नोट बाहेर आली
"शप्पथ, बाकी पैसे काय झाले?" त्याला एकदम धसका बसला.
आम्हालाही काही कळेना नक्की काय झाले ते"अरे माझ्याकडे एवढी एकच नोट राहीली , बाकीचे पैसे सापडत नाहीयेत"
"अरे बघ नीट कुठेतरी ठेवले असशील,"मग सगळ्यांनी त्याची बॅग, आमच्या बॅगा तपासायचा भडीमार केला। तोपर्यंत कंडक्टर थांबायला तयार नाही
"ओ सायेब, लवकर तिकीट काढा नायतर खाली उतरा। पैसे शोधा अन नंतरच्या येस्टीने या," तो गुरकावला.
मी म्हणालो, असतील कुठेतरी तु आत्ता चिपळूणचे तिकीट काढ, तिकडे खाली उतरल्यावर शोधू।त्याप्रमाणे केले आणि मग चिपळूणची वाट पहात बसलो। अर्थात, योगेश हा कप्पा बघ, तो बघ अशी खुडबुड करत होता.चिपळूणला उतरल्यानंतर एक मोकळी जागा पाहून आम्ही तिघांनीही सॅका रिकाम्या करून एकूणएक कप्पा तपासला. पण काही नाही.कुठेतरी गफलत झाली होती किंवा नोटा पडल्या होत्या.आता करायचे काय. आमच्याकडच्या चिल्लरसकट सगळे मिळून ३०-३५ रुपये होत होते. एवढ्या पैशात पुण्यापर्यँत कसे जाणार.घरी कळवायची सोय नव्हती, कारण आम्ही जाणार होतो भलतीकडे आणि एकदम चिपळूणला का गेलो याचे संदर्भासहित स्पष्टीकरण द्यावे लागले असते
शेवटी मला एक युक्ती सुचली. आपण पोलिसांकडे जाऊ, सांगू आमचे पैसै चोरीला गेलेत आणि आम्हाला घरी जायचे आहे.मग आम्ही पोलिस स्टेशन शोधायला निघालो. आता एवढ्या रात्री आम्ही अशा अवजड सॅक पाठीवर घेऊन पोलिस स्टेशन शोधत सुटलो तर चिपळूणसारख्या ठिकाणी माणसे जमणार नाहीत तर काय.मग पाहता पाहता आमची खाजगी बाब सार्वजनिक झाली आणि त्यावर मुक्तपणे चर्चाही झाली.
एकाने सल्ला (फुकटचा)दिला। पोलिसांकडे जाऊन काय उपयोग नाही. ते काही तुम्हाला पुण्याला सोडणार नाहीत.तरीपण आम्ही पोलिसांकडे जायचा हेका काही सोडला नाही. शेवटी एकदाचे हायवे लगतची पोलीस चौकी सापडली. दोन-तिन मामा बाहेरच बनियनवर वारा खात बसले होते.आम्ही जाऊन सगळा पंचनामा ऐकवला. त्यांनी शांतपणे ऐकून घेतले. आणि मग सल्ला दिला
"ह्ये पा, आमी तर काय तुम्हाला पुण्याला सोडू शकणार नाही। (तो माणूस बरोबर सांगत होता) तेवा घरच्यांना कळवा. इथून स्टेशनातून करा फोन. "
आता नेमके तेच तर टाळायचे होते। मग आम्ही थाप मारली की आम्ही तिघे होस्टेलला रहातो आणि घरचे गावाला असतात त्यांच्याकडे फोन नाही
"आता मंग, अस करा, इथून रेल्वेने पनवेलला जा, तिकडून विदाऊट टिकीट बसा आणि कोणी पकडला तर सांगा, आमाला आत्ता काय सांगितला ते,"
हा भन्नाट सल्ला ऐकून गरगरल्यासारखेच झाले। बर, म्हणून मुकाट्याने बाहेर पडलो आणि अंधार्या रस्त्याच्या कडे-कडेने चालू पडलो.बराच वेळ चालल्यानंतर एक टायरचे दुकान लागले. तिकडे पाणी पिण्यासाठी थांबलो. मग मालकाला सगळी कहाणी ऐकवणे भाग पडले,
"च्या मायला त्या पोलिसांच्या। असा सांगतात होय. बारक्या पळ लवकर आणि दादा गेलेत का पहा."
ते बारिक किडकिडीत पोरगे पटकन कुठेतरी जाऊन परत आले
"नाय गेले, हायती"
"चला मग" - आम्हाला उद्देशून
मग आम्ही बॅगा सावरत त्याच्या मागे निघालो। थोडे पुढे गेल्यानंतर एक टाटा सुमो दिसली। त्यात दादा बसले होते. पांढरा शुभ्र झब्बा आणि एकंदरीत अवतार पाहून राजकारणी मंडळी होती हे लक्षात आले. मग त्या टायरवाल्याने आमची करूण कहाणी आणखी मीठ-मसाला घालून दादांच्या कानी घातली.दादा आमच्याकडे वळून म्हणले
"तुमाला कराड फाट्याला सोडतो चालंल का"
माना डोलावून आम्ही गाडीत जाऊन बसलो। मग जाताना दादांनी सगळी तपशिलवार चौकशी केली. कुठून आलो, कुठे गेलेलो, पैसे कसे हरवले इ. इ
"जेवला का रात्रीचा" त्यांनी काळजीने विचारले
आणि आमचे उतरलेल चेहरे पाहून त्यांच्या काय ते लक्षात आले
"गाडीत थोडे वडापाव आहेत, ते खा,"
आम्ही मनोमन त्यांना शतश धन्यवाद देत त्या थंडगार वडापाव वर तुटून पडलो. ते खाल्यानंतर जाणवले की किती भूक लागली होती ते. कारण घरी जायच्या काळजीत आम्ही काहीच खाल्ले नव्हते.दादांनी कराड फाट्याजवळ सोडले आणि आभार मानायचीही वाट न पाहता भरकन त्यांची गाडी निघून गेली.तेव्हा रात्रीचे ११ वाजले असावेत. आम्ही कराडच्या दिशेने जाणार्या वाहनांना हात दाखवायला सुरूवात केली. बर्याच वेळाने एक टेंपो थांबला. हाय रे दैवा, तो पोल्ट्री फार्मचा होता.पण आता फारसा पर्यायही नव्हता। योगेश आणि अन्या पटकन पुढे जाऊन बसले आणि मला कोंबड्यांसह बसावे लागले. आत जाताच इतका उग्र भपकारा आला कि बास रे बास. कसाबासा अंग चोरून त्या जागेत बसलो. टेंपोचालक चाळीसपेक्षा कमी वेगाने जाणे म्हणजे कमीपणा असल्यासारखे गाडी चालवत होता. आणि आत मला धरायला काही नसल्याने इकडून तिकडे आपटणे नशिबी आले.
कुंभार्ली घाटातही आमचा शूमाकर सुसाट चालला होता। मी दोन्ही हातपाय ताणून शक्य तितके स्थिर राहण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी घाट संपल्यानंतर गाडी कुठेतरी थांबली आणि मला जरा हायसे वाटले.आलोच थांबा म्हणून तो टेंपोचालक कुठेतरी पसार झाला. मी आळोखे-पिळोखे देत अवघडलेले अंग सैल करायच्या मार्गाला लागलो. बराच वेळ गेला तरीही आमच्या सारथ्याचा काही पत्ता नाही. नक्की कुठे थांबलोय याचाही पत्ता लागेना. अजून अर्धा तास थांबलो तरी सामसूम
शेवटी तो ज्या दिशेने गेला होता त्या बाजूने पुढे गेलो। एक धर दिसले. थोडा धीर केला आणि दार वाजवले.बराच वेळाने आतून आवाज आला आणि दार उघडले. आतून एक मध्यमवयीन बाई डोकावल्या. टिपीकल गावाकडची बाई. डोक्यावरून पदर, कपाळावर बचकभर कुंकु वगैरे
"काय हवाय?"
aamhii चाचरत विचारले,
"मावशी ते टेंपोवाले कुठे गेले? तुमच्याकडे आलेत का?"
"टेंपोवालं, कंच?"
"अहो तो बाहेर थांबलाय ना टेंपो"
"जंत्रला जायचा का तुमाला"आम्ही हादरलो, आता हे काय नविनआम्ही काही बोलेपर्यँत कुठूनतरी भलतीकडूनच तो टेंपोवाला उगवला. आणि काही न बोलता टेंपोत जाऊन बसलापण. आम्ही पटापट त्या मावशींना नमस्कार करून सटकलो। मध्यरात्रीच्या सुमारास (२-३ वाजले असावेत) त्याने आम्हाला कराडला आणून सोडले आणि वीस रूपये घेऊन निघून गेला
थंडी कमालीची होती आणि तसेच कुडकुडत आम्ही पुण्याला दिशेने जाणार्या वाहनाची वाट पहात बसलो। थोड्या वेळाने कोल्हापूरकडून येणारा दूध टँकर दिसला (वारणा का गोकूळ असे काहीतरी). त्या भल्या चालकाने आम्हाला आत घेतले. चला आता पुण्यापर्यँत काही त्रास नाही म्हणत सुखात बसलो. पहाटे पहाटेला पुण्याजवळ येऊन ठेपलो. तोच त्याने टँकर बाजूला घेतला. आम्ही प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत असाना त्याने खुलासा केला
"सायेब, आम्ही रातभर टँकर चालवतो। पण पन या येळेला जाम झोप येतुया. म्हनून या येळेला आमी गाडी चालवत नाय. तुमी जरा सरकून बसा मी जरा झोपतो हितं."
बिच्चारे आम्ही, मिळेत त्या जागेत दाटीवाटीने बसलो आणि त्याला झोपायला जागा केली। थोड्याच वेळात तो घोरायला पण लागला. आणि आता तो कधी जागा होणार याची वाट पहात आम्ही बसून राहीलो.तासभर असाच गेला आणि मग महाराज उठले. खाली उतरून तोंड खंगाळून निवांतपणे मशेरी लावायला सुरूवात केली. त्यांचा वेग पाहून अन्या माझ्या कानात कुजबुजला
"अरे त्याला म्हणावं, किमान दुपारपर्यँत तरी पुण्याला पोहोचव रे बाबा. मरणाची भूक लागली आहे."आमचीही तीच अवस्था होती. आदले दिवशी दुपारी चिपळूणला केलेल्या जेवणानंतर रात्रीच्या
त्या थंड वडापावव्यतिरीक्त काहीच खाल्ले नव्हते.आमच्या सहनशक्तीचा अंत पहात महाराज चहा प्यायला बसले. मग सावकाश येऊन टँकर चालू केला आणि काही वेळाने आम्हाला कात्रजला टाकले. तिकडून मग सहा आसनीने स्वारगेट आणि मग घरी असा जेव्हा आलो तेव्हा खिशात फक्त दोन रूपये उरले होते.मनोभावे ते कपाळाला लावले आणि म्हणालो असा पुन्हा कधी रूसू नकोस रे बाबा.(समाप्त)
Mast re!!!
ReplyDeleteZakass aahe ha post!