Thursday, October 6, 2011

कोकण भटकंती बाईकवरून भाग-४

दिवस चौथा
रात्रीच्या काळोखातून केळशीतील पहाट उगवली तीच मोठी प्रसन्नता घेऊन. इतकी सुंदर पहाट बर्‍याच वर्षांनी अनुभवयाला मिळाली. काल रात्री अंधारात हे गाव किती देखणे आहे हे कळलेच नव्हते आणि एखाद्या सुंदर स्वप्नासारखे ते डोळ्यासमोर उलगडत गेले. आत्ता कुठे जरा कोकणात आल्याचा फील यायला लागला होता. स्मित



या घरात आम्ही राहीलो



आजचा पल्लाही मोठा होता. वाटेत हर्णे, कनकदुर्ग, फत्तेदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि गोपाळगड करून दापोली-दाभोळ मार्गाने गुहागर गाठायचे होते. पण आजचा दिवसही खास होता. आज आम्ही दोघेही किल्ल्यांची पन्नाशी पार करणार होतो आणि ती पण सुवर्णदुर्गसारख्या किल्ल्यावर. त्यामुळे दोघेही विशेष उत्साहात होतो.
दिवसाची सुरूवात तर चांगली झालीच होती. त्यात भर पडली आंजर्लेच्या देखण्या गणेशमंदीराने. कड्यावरचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण अतिशय सुरेख आहे. इथली शांतता आणि सभोवतालचा लोभस निसर्ग हे एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात.



मग तिथेच भरपेट नाष्टा करून थोडेसेच पुढे गेलो तो एक सुखद धक्का बसला. तिथल्या किनार्‍यावर हजारोंच्या संख्येने सी-गल्स बसले होते. याच पक्ष्यांचे फोटो काढण्यासाठी मी अलिबागला जिवाचा आटापिटा केला होता तेच इतक्या मोठ्या संख्येने दिसल्यावर आनंदातिशयाने काय करावे ते सुचेना. आज अमेयचा गाडी चालवण्याचा टर्न होता त्यामुळे तो गाडी पार्क करून येईपर्यंत मी सॅक, हेल्मेट तिथेच रस्त्यावर टाकले आणि टेली लाऊन पक्ष्यांच्या दिशेने सुटलो.
अर्थातच त्यामुळे अमेयची चिडचिड झाली असावी पण त्याने ते लाईटली घेतले. दरम्यान मला काही छानश्या फ्रेम मिळाल्या. पण बॅटरी जीव टाकत होती. मला लवकरात लवकर नविन बॅटरी घ्यावी लागणार आहे याची तीव्र जाणीव होत होती. पण इतर कशाहीकडे लक्ष न देता मी शक्य तितके जवळ जाऊन शिकार करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.








मनमुराद फोटो काढल्यानंतर पुढच्या प्रवासाला लागलो. आजचा दिवस भारीच ठरणार होता याची आम्हाला खात्री झाली.
हर्णेला जाताच एका किल्ल्याचे अवशेष दिसले. त्याचे फोटो काढतानाच आम्हाला तिथे एक आजोबा दिसले.
"आजोबा हाच हर्णेचा किल्ला का?"
"हा भुईकोट किल्ला.. " एकदम शुद्ध मराठीत
"हो पण हा हर्णेचाच किल्ला ना?"
"हा भुईकोट किल्ला" ....परत तेच
"अहो ते ठीक आहे, हा हर्णेचा भुईकोट किल्ला का????"
"एकदा सांगितलेले कळत नाही...हा भुईकोट किल्ला आहे ते..परत परत काय तेच विचारता".. आजोबा एकदम कावले. बहुदा पुण्याचे असावेत कारण विचारलेल्या प्रश्नाला धड उत्तर न देताच निघून गेले.


मग आम्हीच आमची समजूत घातली हर्णे बंदराजवळ हर्णेचाच किल्ला असणार म्हणून. पुढे जाताच बंदराजवळ कनकदुर्ग दिसला. सांगातीमध्ये त्याचे फोटो पाहिले असल्याने त्याची ओळख लगेच पटली. मग पटापट तो किल्लाही आमच्या खाती जमा केला. किल्ला अगदी लहान. किल्ला म्हणण्यापेक्षा पहाऱ्याची चौकीच.
किल्ला म्हणण्यासारखे काहीच शिल्लक नाही. मग तिथल्याच लाईटहाऊस आणि आजबाजूचे फोटो काढून किल्ला साजरा केला.


समोरच फत्तेदुर्ग दिसत होता. इथे तर अजिबात अवशेष शिल्लक नाही. कोळ्यांनी वस्ती करून उरल्या-सुरल्या खुणादेखील गायब केल्या आहेत.

आता ओढ लागली होती पन्नासाव्या किल्ल्याची...किल्ले सुवर्णदुर्ग..
पण दुधात माशी पडावी तसे एका कोळ्याने सांगितले की किल्ल्यावर जायची परवानगी नाही शासनाची..
मला तर असे काही वाचल्याचे आठवत नव्हते. त्यामुळे तिकडे दुर्लक्ष करून नावाडी शोध मोहीम चालूच ठेवली. शेवटी एकजण तयार झाला.
नेहमीप्रमाणेच त्याने दे दणादण ५०० रुपयांची मागणी केली. पुन्हा घासाघिस..आणि शेवटी तीनशेवर तयार झाला तेही फक्त १० मिनिटे किल्ल्यात थांबणार या अटीवर...च्यायला दहा मिनिटात काय भोज्ज्याला हात लाऊन परत यायचे का. पण साहेब काय बधायला तयार नाहीत.
"तुमाला पायजे तर दुसुरा कोनतरी सोधा.."
आता काय बोलणार..शेवटी दहाची १५ मिनिटे करून त्याच्या बोटीत पाऊल ठेवले.
बोटीतून दिसणारा कनकदुर्ग

समोरच बुलंद किल्ला आणि त्याची तटबंदी दिसत होती. नावाड्याकडून कळले होते की इथे कुणी येतच नाही. आणि त्याचा प्रत्यय किल्ल्याजवळील वाळूवर उतरल्यावर आला. कुठेही मानवी प्रदुषणाची चिन्हे नाहीत की कसल्या खुणा नाहीत. एकदम निर्मनुष्य आणि एकाकी किल्ला. त्या वाळूतून बऱ्याच महिन्यांनतर आमचीच पावले उमटत चालली होती. डाव्या बाजूला त्या धडकी भरवणाऱ्या भिंतीमुळे आणि या अनघ निसर्गामुळे आम्हाला अगदी कुठल्यातरी एक्सपीडीशनला चालल्यासारखे वाटत होते.

दुर्गम भागात संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसारखे पुढे सरकलो तोच किल्ल्याच दरवाजा सामोरा आला. अनेक मराठमोळ्या किल्ल्यांप्रमाणे याचे प्रवेशद्वारही गायमुख पद्धतीचे होते. वाटेतच दोन तोफा पडल्या होत्या. त्यावल छानपैकी वेलीवगैरे चढल्या होत्या. एकूणच माहोल फार गूढरम्य असा भासत होता.




वेली बाजूला करत आणि झुडूपातून वाट काढत कसेबसे दारातून आत गेलो तर संपूर्ण किल्ला झाडीने भरलेला. पुढे जाणे अशक्य. मग तिथल्याच पायर्‍यांवरून तटबंदीवर चढलो. आजबाजूला नजर टाकली तिथे सगळीकडे झाडी माजलेली.

तोपर्यंत बोटवाल्याचा आरडा-ओरडा सुरू झाला होता आटपा आटपा म्हणून. आम्ही दोघे त्याला एकट्याला ऐकणार नाही म्हणून त्याने त्याची दोन पिल्ले आणली होती. आणि ते दोघे आम्हाला जाम भंडावून सोडत होते.

त्यांचा पुरेसा अंत पाहून आम्ही जमतील तितके फोटो काढत परतलो. बोटवाल्याची बडबड सुरूच होती. शेवटी त्याला माझे प्रेसकार्ड दाखवले.
"कुणी अडवले तर आपण हे दाखवू, मला कोण काय नाही करू शकत कळलं. मी इथे सरकारी कामासाठी आलोय..."
मग तो थोडा शांत झाला आणि वर माझे नाव आणि नंबर मागून घेतला. प्रवासात मी नेहमी व्हिजीटींग कार्ड बरोबर बाळगतो. त्यातले एक त्याला दिल्यावर त्याला हायसे वाटले. मग येताना राजाच्या रुबाबात फोटो सेशन केले.

वी हॅव डन इट...थोडेथोडके नाहीत पन्नास किल्ले...
मन अत्यानंदाने नुसती उसळी मारत होते.
मग बाईकवर जर्कीन, टॉवेल टाकून पुढचा रस्ता धरला. (हो हे सांगायचे राहीले..सततच्या बाईकींगमुळे पार्श्वभागाखाली काहीतरी घेतल्याशिवाय बसणे ही एक मोठी शिक्षा होती)
तिथून दापोली आणि मग दाभोळ असा ५०-६० किमी प्रवास रस्ता चांगला असल्याने फारच छान पार पडला.
दाभोळवरून पुन्हा एकदा फेरी-बोटमध्ये बाईक चढवली. आता तिलाही याची सवय झाली असावी.
आजच्या दिवसाचा मुख्य भाग सुरळीत पार पडल्यामुळे मी बॅटरीची चिंता न करता मनमुराद फोटो काढले.
गायबगळा

ब्राम्हणी काईट




तिथून पुढे एन्रॉनपर्यंतचा रस्ताही सुरेख असल्याने अमेयने ड्रायव्हींगचा आनंद घेत सुसाट गाडी पळवली. अपेक्षेपेप्रमाणेच सगळे व्यवस्थित वेळेत पार पडल्याने गोपाळगडवर आम्हाला सूर्यास्त मिळणार होता. आणि आम्ही किल्ल्यावर पोचतो न पोचतो तोच सूर्याने टाटा बाय बाय म्हणायला सुरूवात केली. कॅमेरा सरसावून किल्ल्याकडे जातानाच एक भारदस्त गृहस्थ भेटले.
"मी .. .. डीवायएसपी..सातारा"
आयला कामाचा माणूस..लगेच माझ्यातला पत्रकार जागा झाला..
मग माझी ओळख करून दिली पण माझे निम्मे लक्ष सूर्यास्ताकडे..
"या किल्ल्याचा काय इतिहास आहे हो...?"
आता त्यावेळी माझ्या स्मरणशक्तीने मला दगा दिला. मला काय आठवेच ना. आणि माहीती नाही म्हणून सुटका करून घेणे पण प्रशस्त वाटेना.
शेवटी देवाचे नाव घेतले आणि बाणकोटचा इतिहास गोपाळगडच्या नावावर खपवून टाकला.
'देवा मला क्षमा कर, मी काय सांगतोय आणि हा काय ऐकतोय हे माझे मला आणि त्यालाही ठाऊक नाही...आमेन.' स्मित
त्या पोलिसी पकडीतून सुटका होताच मी किल्ल्याकडे अक्षरश धाव घेतली. तोपर्यंत साहेबांनी ढगांच्या पांघरूणात दडी मारायला घेतलीच होती. ऐवढी धावपळ केल्याचे चिज झाले आणि काही सुरेख प्रचि मिळाली.




प्रसन्न पहाटेनी सुरू झालेला दिवस तितक्याच छान सूर्यास्ताने मावळला. आणि आम्ही आमचा मार्ग धरला.
गुहागरमध्ये जाताच स्वस्त आणि मस्त खोली शोधण्याचा सपाटा लावला.
एका घरगुती रेस्टहाऊसमध्ये शिरलो. तिथे जाऊन त्यांना सांगितले..
"आम्ही ट्रेकर आहोत, आणि उद्या सकाळी आम्ही लगेच निघणार आहोत. तेव्हा फक्त रात्री झोपण्यापुरती जागा हवी आहे. कोणतीही सोयी-सुविधा नसली तरी चालेल. कितीमध्ये देऊ शकाल?"
यावर तो माणूस एकदम गोंधळला. दरम्यान त्यांचे वयोवृद्ध वडील आले. त्यांनाही सर्व सांगितले.
"किती देऊ शकाल?
"कमीत कमी कितीही...जास्तीत जास्त दोनशे"
दोनशे.... असे म्हणत ते झोपाळ्यावर बसले आणि डोळे मिटून विचार करू लागले. आम्ही मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडे बघत बसलो. बराच वेळ झाला तरी ते डोळेच उघडेनात.
मनात आले म्हणावे एवढा त्रास होत असेल तर राहू द्या, आम्ही दुसरीकडे बघतो.
दरम्यान, अमेयला शंका आली..माझ्या कानात तो कुजबुजला..
"अरे झोप लागलीये त्यांना.."
कितीही आवरले तरी एकदम फिस्सकन हसू आले
त्या आवाजाने आजोबांनी डोळे उघडले आणि रेकले.."नाही मिळणार दोनशेत..."
बरंय म्हणून सॅक उचलली तरी आमचे हसणे काय थांबत नव्हते.
तिथून पुढे भक्तनिवास मिळाला आणि छानशी सोय झाली. पण तिथल्या काकूंनी अगदी काळजीने विचारले..
"अरे दोघेच बाईकवरून फिरताय..कशाला अघोचरपणा करता..घरच्यांच्या जीवाला घोर..घरी फोन तरी करताय का नाही.."
त्या अनोळखी ठिकाणी मिळालेल्या त्या मायेच्या शब्दांनी अगदी भरून आले. एकदम घरच्यांची तीव्रतेने आठवण झाली. दरम्यान कडकडून भूक लागलेलीच. भक्तनिवासमध्ये रहायचे म्हणून अमेयने स्वेच्छेन मासळी खाण्याचा बेत रद्द केला. मी तर पोटाला जपून असल्याने शाकाहारीच होतो.
एका टीपिकल हॉटेलमध्ये गेलो आणि तिथेही स्वादिष्ट अन्नाची मेजवानी मिळाली. मग काय भस्म्या मोड पुन्हा ऑन..
हे आणा..ते आणा..पोळ्या आणा..सोलकढी आणा..भात आणा..
तो मालक आमच्या खादाडीकडे आचंबित होऊन बघत होता. पण काय बोलणार..त्याला बरेच वाटत असेल. पण तुडुंब पोट भरल्यावर उठलो आणि बील देताना त्याला जेव्हा विचारले..
"इथे कुठे आईस्क्रीम मिळेल का हो...?"
तेव्हा त्याला राहवेना
"आईस्क्रीम आत्ता?...यावर..?"
मग एकदम त्याला जाणवले की आपण भलतेच बोलून गेलो..मग स्वताला सावरत त्याने आईस्क्रीम पार्लरला पत्ता सांगितला.
अर्थात आमचाही नाईलाज होता..पन्नाशी गाठल्याचे सेलिब्रेशन आईस्क्रीमने करणार नाही तर कशाने...
मग मुद्दाम त्याला खिजवण्यासाठी येताना पुन्हा त्याच रस्त्याने आलो आणि जाता-जात डायलॉग टाकला..
"अरे आत्ताचा दुसरा फ्लेवर जास्त छान आहे..मगाचे एवढे खास नव्हते.." स्मित
भक्तनिवासमधल्या खोल्या अगदी ए-वन होत्या. मग झोपण्यापूर्वी सगळा हिशोब पार पाडून आणि उद्याचा प्लॅन डोक्यात घोळवत शाही झोपेच्या राज्यात घुसलो.

कोकण भटकंती बाईकवरून भाग ५

दिवस पाचवा -
आज आमच्यापुढे गहन प्रश्न होता. रत्नागिरीला जावे अथवा नाही. आधीच्या प्लॅननुसार आम्ही रत्नागिरीजवळील रत्नदुर्ग आणि त्याच्या थोड्या पुढे असलेला देवगडपासून मोहिमेची सांगता करणार होतो. पण मध्ये माझ्या आजारपणामुळे निम्मा दिवस वाया गेलेला. त्यामुळे आता काय करावे हा विचार डोक्याला शिणवत होता.
रत्नागिरीला जायचे तर एवढ्या लांब जाऊन फक्त एकच किल्ला मिळणार होता आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे दुसरे दिवशी रत्नागिरी ते पुणे असा जवळपास साडेतीनशे किमी हून अधिक अंतर कापावे लागणार होते. आधीच आमचे सहाशे-सातशे किमी बाईकिंग झाले होते त्यावर अजून म्हणजे हालत होती.
एकच होते की रत्नागिरीला एकांच्या ओळखीने फुकट राहण्याची सोय होणार होती.
शेवटी काय ते हेदवीला जाऊन ठरवू असे म्हणत निघालो. कालचे ते हॉटेल मस्त होते त्यामुळे तिथेच जाऊन भरपेट नाष्टा केला आणि हेदवीच्या दिशेने सुटलो...
हेदवीची ब्राम्हणघळ खूप प्रसिद्ध आहे पण नेमके आम्ही चुकीच्या वेळी गेलो त्यामुळे जिथे भरतीच्या वेळी उभे राहणे पण मुश्किल होते तिथे आम्ही छानपैकी घळीत डोकावून पहात होतो.
हेदवीचा समुद्रकिनारा

थोडी निराशा झालीच पण तिथल्याच एका हॉटेलमध्ये असे कळले की जयगड फारसा लांब नाही आणि आत्ता निघून दुपारपर्यंत येणे शक्य आहे. अरे वा, मग बोंबलत रत्नागिरीला जाण्यापेक्षा परत गुहागरला मुक्काम करता येणे शक्य होते आणि दुसरे दिवशी गुहागर-पुणे हे अडीशेच किमी राहणार होते. हे एकदम बेस्ट झाले.
आज माझा टर्न होता गाडी चालविण्याचा. सुरुवातीला चांगला रस्ता लागला त्यामुळे खुश होतो पण नंतर त्या प्रचंड चढ उतारवाल्या रस्त्यांनी जो हिसका दाखवला तो म्हणजे हैराण करणारा होता.
प्रचंड वळणे आणि एकदा तीव्र उतार की थोड्या वेळाने एकदम तीव्र चढ असे करत तडफडत नरवणमार्गे कुडली गाव गाठले. गावातला उतार इतका तीव्र होता की दोन्ही ब्रेक दाबूनच गाडी चालावावी लागत होती. गावातल्या धक्क्यापाशी पोचलो आणि खऱ्या अर्थाने धक्का बसला तिथली होडी पाहून...आधीच तिथे सहा-सात बाईकवाले उभे होते आणि ती होडी म्हणण्यापेक्षा होडके या सगळ्यांना घेऊन जायला किती फेऱ्या मारणार या विचारात पडलो. त्याहून धक्का बसला म्हणजे त्या बोटवाल्या कोकण्याने सगळ्या गाड्या एकदम घेऊन जायचे जाहीर केले तेव्हा. आणि केले की त्याने. तो आणि मदतीला एक जण अशा दोघांनी दे दणादण सगळ्या बाईक्स भराभर त्या होडक्यात बसवल्या आणि वर प्रवासीपण घुसवले.

होडक्यात बाईक चढवताना अमेय आणि कोकणी बोटवाला...


ते होडके म्हणजे दुचाकी गाड्यांचे शोरूमच झाले होते. आमच्या युनिकॉर्नबरोबर, यामाहा, हिरो-होंडा, बजाज पल्सर अशा अनेकाविध गाड्या तिथे सुखाने बसल्या होत्या. माझी बाईक अगदीच कडेला उभी केल्याने मी आणि अमेयने सर्व ताकत लाऊन धरून ठेवली होती.
तो कोकणी म्हणजे एक अस्सल नमुना होता. एकतर अखंड त्याची टकळी सुरू होती आणि एकेकाची तो जे खेचत होता ते ऐकून सॉलीड धमाल येत होती.
पलिकडच्या काठावर उतरल्यानंतर तितक्याच वेगाने त्याने सगळ्या गाड्या अनलोड केल्या आणि पुढच्या फेरीसाठी रवाना झाला.
इथून पुढे जयगडपर्यंतचा प्रवास हा एक लक्षात ठेवण्यासारखा होता. मला अजूनही जसाच्या तसा तो भाग आठवतो, चित्रात जपून ठेवल्यासारखा...
बराच चढ चढून आल्यावर आम्ही डोंगरमाथ्यावर पोचलो आणि तिथून एक रस्ता सरळ रेषेत पार अगदी क्षितीजापर्यंत गेला होता. असा रस्ता कोकणात अगदीच दुर्मिळ...त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुकलेली झाडी होती आणि त्या पिवळसर पार्श्वभूमीवर दुपारच्या उन्हात तो वैराण रस्ता संपता संपत नव्हता. त्या भागातच कंटाळा इतका ठासून भरला होता की भरधाव गाडी चालवतानाही मला जांभया येत होत्या...असो.
जयगडला पोचलो तेव्हा उन्ह चांगलेच वर आले होते आणि घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या.
जयगडबद्दल मी फारश्या अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. पण किल्ल्यात बघण्यासारखे बरेच काही आहे. उन्हाने वैतागलो होतो त्यामुळे फारसा वेळ न घालवता पटापट फोटो मारून निघायचे असा बेत होता पण त्या किल्ल्यात एवढे गुंगलो की वेळ किती गेला ते कळलेच नाही.
किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार


खंदकाकडे जाणाऱ्य मार्गावरील द्वार

खंदक
From Konkan Trip

जयगडचा इतिहास फारसा नाही. पण शास्त्री नदीच्या मुखाशी वसलेला किल्ला आहे मात्र देखणा. हा किल्ला बांधताना बुरुज सारखे ढासळत होते त्यामुळे जयबा नावाच्या एका सैनिकाने आपणहून बांधकामाच्याखाली बलिदान दिले. त्यामुळे किल्ल्याचे नाव जयगड ठेवण्यात आले अशी वदंता आहे. किल्ल्यात त्या जयबाची घुमटीपण आहे.
कालांतराने या किल्ल्याचा शासकीय विश्रामगृह म्हणूनपण वापर झाला.


एका तीन मजली इमारतीचे अवशेष, मारूती मंदीर, लाईट हाऊस सारखी एक इमारत, भक्कम तटबंदी असे बरेच काही कॅमेराच्या डोळ्याखाली घालून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.










पुन्हा एकदा त्या कंटाळवाण्या मार्गाने खाडी गाठली. तो कोकणी होताच स्वागताला. पुन्हा एकदा त्या धोकादायक वाटणाऱ्या होडक्यातून आमची गाडी सुखरूप पैलतीरी नेली आणि हेदवी गाठले.
त्या हॉटेलच्या मालकांना आश्चर्य वाटले. कारण आम्ही जाताना अंदाज केला होता की तीनपर्यंत परत येता येईल म्हणून. आणि बरोबर तीनला एक मिनिट कमी असतान त्यांच्या हॉटेलपाशी जाऊन हॉर्न दिला.
मग त्यांच्याच बागेत जरा फोटोसेशन केले.


From Konkan Trip




या आख्ख्या कोकणप्रवासात किल्ले हेच उद्दीष्ट ठेवल्याने समुद्रकिनारी डुंबायला वेळच मिळाला नव्हता. त्यामुळे त्याची भरपाई करण्यासाठी गुहागर गाठले. भक्तनिवासाची खोली दुसरे दिवशीपर्यंत बुक करून फक्त कॅमरा आणि कपडे घेऊन गुहागरचा किनारा गाठला.
आणि गेल्या गेल्याच असल्या फ्रेम्स मिळायला लागल्या की बास.









शेवटी सूर्यास्त झाल्यावर आम्ही कॅमेरा बाजूला ठेवला आणि डोळे लाल होईपर्यंत मनसोक्त पाण्यात डुंबलो.
पाच दिवसाचा धावपळीचा, सततच्या बाईकिंगचा, वेळी-अवेळी खाण्याचा शीण भरून निघत होता. ते समुद्रस्नान इतके सुखद होते की भुकेची जाणीव झाली नसती तर तिथेच डुंबत राहीलो असतो रात्र होईपर्यंत.
आंघोळी उरकून पुन्हा एकदा काकांच्या हॉटेलवर धाड टाकली. आम्हाला बघताच त्यांनी लगबगीने आत जाऊन सुचना दिल्या बहुदा.
अरे ते कालचे बकासुर आलेत. या टेबलला दोघांची सर्वि्स लावा. स्मित
आणि आम्ही त्यांची निराशा केली नाही. मनसोक्त समुद्रस्नानामुळे तर पोटात आगडोंब उसळला होता. त्यामुळे भरभक्कम बील होण्याइतके हादडलेच शिवाय जाताना तिथे विकायला ठेवलेले कोकम आगळ, कँडी, मँगो कँडी असा कोकणी मेवापण खरेदी केला.
आमच्यासारखे ग्राहक रोज यावेत असे काकांनी नक्कीच गाऱ्हाणे घातले असणार तिथल्या दैवताला.
घरी फोन करून उद्या येत असल्याची सुवार्ता कळवली आणि एका सुरेख ट्रेकची तितकीच सुरेख सांगता झाल्याच्या आनंदात अंग टाकले.
==================================================================
खांदेरी-उंदेरीला झालेली निराशा आणि माझे पोटाचे दुखणे या गोष्टी वगळता आमची कोकण मोहीम प्रमाणापलिकडे यशस्वी झाली. सगळ्यात आधी लिहील्याप्रमाणे माझ्या होंडा युनिकॉर्नचा त्यात मोलाचा वाटा होता. निर्जन ठिकाणी गाडीला काही झाले असते तर आमच्यासारखे हाल कोणाचे नसते. या प्रवासात अनेक माणसे स्वभावाची माणसे भेटली, निसर्गाचे घडीघडी बदलणारे रूप पाहिले, सूर्योदय-सूर्यास्ताचे मनोहारी रंग अनुभवले आणि समुद्र..तो तर आमचा सखा झालाय. त्या रत्नाकराने तर त्याची किती म्हणून रुपे दाखवायची. प्रत्येक ठिकाणचा समुद्र वेगळा...आणि प्रत्येक गोष्ट कॅमेरात टिपणे हे केवळ अशक्यप्राय होते पण मेंदूच्या हार्डडिस्क मध्ये सेव्ह झालेली आठवचित्रे अजूनही आमच्या सोबत आहेत आणि सोबत राहतील...

समाप्त.....